आसामच्या ‘करीमगंज’ जिल्ह्याचे नाव आता ‘श्रीभूमी’

22 Nov 2024 15:23:09
Himanta

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राज्याच्या ‘करीमगंज’ ( Karimganj ) जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. हा जिल्हा आता ‘श्रीभूमी’ म्हणून ओळखला जाईल.

मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आसाम मंत्रिमंडळाने या बदलाला एकमताने मंजुरी दिली. बैठकीनंतर मुख्यमंत्री सरमा यांनी आपल्या निर्णयाची घोषणा करून निर्णय मीडियासोबत शेअर केला. ऐतिहासिक उल्लेख नसलेल्या सर्व ठिकाणांची नावे बदलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

‘करीमगंज’चे नाव बदलून ‘श्रीभूमी’ करण्यामागे मुख्यमंत्री सरमा यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या १९१९ मध्ये सिल्हेटला दिलेल्या भेटीचा उल्लेख केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सिल्हेटच्या या भागाला ‘सुंदरी श्रीभूमी’ असे संबोधले. फाळणीनंतर सिल्हेट पूर्व पाकिस्तानचा (आताचा बांगलादेश) भाग झाला. हिमंता बिस्व सरमा यांच्या मते, ‘करीमगंज’चे ’श्रीभूमी’ असे नामकरण केल्याने हे ठिकाण ऐतिहासिक मूल्यांशी जोडले जाईल.

Powered By Sangraha 9.0