प्रदूषण

    22-Nov-2024
Total Views |
 
Pollution
 
 
राजकीय धुळवड गेले काही दिवस बघायला मिळाली. यात विचारांचे प्रदूषण अधिक आणि विकासाचे, प्रगतीचे वातावरण निर्माण करणारे मात्र कमी. त्यामुळे कोणाला धडा मिळाला, हे आज आलेल्या निकालानंतर स्पष्ट होईलच. असे असले तरी आणखी एका प्रदूषणाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. देशातील प्रत्येक महानगर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे आपण दरवर्षी बघतो. राजधानी दिल्लीत तर भयंकर परिस्थिती.
 
राजकीय धुळवड गेले काही दिवस बघायला मिळाली. यात विचारांचे प्रदूषण अधिक आणि विकासाचे, प्रगतीचे वातावरण निर्माण करणारे मात्र कमी. त्यामुळे कोणाला धडा मिळाला, हे आज आलेल्या निकालानंतर स्पष्ट होईलच. असे असले तरी आणखी एका प्रदूषणाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. देशातील प्रत्येक महानगर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे आपण दरवर्षी बघतो. राजधानी दिल्लीत तर भयंकर परिस्थिती. यावर उपाययोजना करण्यासाठी खरोखर आता सर्वांनी आपसातील मतभेद विसरून मानवतेसाठी आणि आपल्या उद्याच्या नव्या पिढ्या सुरक्षित जगाव्या यासाठी प्रामाणिक आणि प्रभावी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. ती वारंवार अधोरेखितदेखील होत असते. मात्र, यासाठी आपण कोठे कमी पडतो, यावर कोणीही कार्य करताना दिसत नाही. जरी अन्य संस्थांनी यासाठी पुढाकार घेण्यास सुरूवात केली, तरी ही गती जेवढी अधिक असायला हवी, तशी नसल्याने वारंवार त्याच वाईट गोष्टींची पुनरावृत्ती दरवर्षी होत असते. जसे दिल्लीतील प्रदूषण या काळात ऐरणीवर येते, तसे पुणे परिसरात इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा मुद्दादेखील वारंवार ऐरणीवर येत असतो. पुण्यातील हवेच्या गुणवत्तेची जी आकडेवारी रोज येते ती वाईट श्रेणीत अधिक असते. उदाहरणादाखल काही परिसरातील हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक धक्कादायक आहेत. भूमकरनगर (१८२ गवळीनगर पिंपरी-चिंचवड (२५८)थेरगाव (२८३ कात्रज डेअरी परिसर (२४१) विद्यापीठ (१९६) यावरून आपले महानगर दिवसेंदिवस किती प्रदूषित होण्याकडे वाटचाल करीत आहे, याचा अंदाज नक्कीच येईल. तो गांभीर्याने किती घ्यायचा आणि कोणी घ्यायचा हे कळीचे प्रश्न आहेत. इंद्रायणी नदीतील प्रदूषणाच्या बाबतीत नेमके हेच घडताना दिसते. एकीकडे पुणे महानगर आपल्याला जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून लौकिकास आणायचे असताना अशा छोट्या प्रश्नांना विनाकारण मोठे केले जाते.
 
त्यामुळे समस्या अधिक जटील बनतात. इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची समस्या तशीच जटील बनली आहे. एवढेच कशाला, पुण्यातील प्रदूषणाची स्थितीदेखील दिवसेंदिवस बिकट होताना दिसते. महानगरातून जाणारी मुठा नदी एक मोठा नाला बनल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे यातून सुटकेसाठी समस्येचे रूप वाढता कामा नये आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे हेच पर्याय उरतात.
आकर्षण
कालमानानुसार मानवाला कशाचे आकर्षण निर्माण होईल, हे सांगता येत नाही. काळ इतका झपाट्याने बदलत आहे की, माणूस काल ज्या आकर्षणाला भूलला होता, तो आज अन्य कोणत्यातरी अन्य मोहात अडकलेला दिसतो. अर्थात, यात आनंद घेणे आणि धक्के सोसणे हे त्या त्या वेळी सामोरे जायच्या परिस्थितीवर अवलंबून असते. काही आकर्षणे शाश्वत असतात. आजच्या काळात सर्वांना विशेषतः तरूणाईला क्रिकेट, राजकारण आणि शेअर बाजाराचे आकर्षण अधिक. बरं, या तिन्ही क्षेत्रात एक समान धागा आहे, तो म्हणजे आकडेवारी. क्रिकेटमध्ये धावा, राजकारणात निवडणुका आहेत म्हणून मतांची आणि शेअर बाजारातील निर्देशांकाच्या चढ-उताराची आकडेवारी हाच या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. अलीकडच्या काळातील या दोन्ही क्षेत्रांत ज्या घडामोडी घडत आहेत, त्या या क्षेत्राचे आकर्षण असणार्‍यांसाठी किती ‘थ्रिल’ निर्माण करणार्‍या आहेत, हे सांगायलाच नको. ट्रम्प निवडून आले म्हणून, मार्केट वधारते काय आणि अदानींवर अमेरिकेत आरोप लागतात म्हणून कोसळते काय... सारे काही धक्कादायक असेच! क्रिकेटमध्येदेखील आधीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला सातवे आसमान दाखविणारा भारतीय संघ नंतरच्या सामन्यांमध्ये अन्य प्रतिस्पर्ध्यांपुढे चारी मुंड्या चीत होतो काय, हे सगळे या क्षेत्राचे आकर्षण असणार्‍यांसाठी रोमांचक आणि धक्कादायक.
 
अदानी समूहावरील अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर कोसळलेला भारतातील शेअर बाजार आज एकाएकी उसळला आणि मागील सामन्यांमध्ये पराभव स्वीकारणार्‍या भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया संघाविरोधातील कामगिरीदेखील काहीशी सुधारलेली दिसली. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे ‘एक्झिट पॉल’च्या माध्यमातून जे कौल समोर आले आहेत, तेदेखील रंजकच आहेत. काहींचे निसटते पराभव आणि निसटते विजय, या आकड्यांमुळेच होत असतात. त्यामुळे ही आकर्षणाची केंद्रस्थाने कुणी कशी काबीज करायची आणि धरायची की, सोडून द्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. तूर्तास या आकर्षणाला भूललेला मानव एका वेगळ्या रोमांचक अनुभवांची प्रचिती घेत आहे. यात संदेश नाही, कालाय तस्मै नमः... दुसरे काय?
अतुल तांदळीकर