युक्रेन युद्धात अमेरिका आणि तिचे मित्र देश युक्रेनला मदत करत आहेत. रशियात आता साम्यवादी राजवट नाही. त्यामुळे आणि अन्यही कारणांमुळे चीन निदान उघडपणे तरी रशियाला मदत करत नाही. अशा स्थितीत अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी रणभूमीवर सैनिक उतरवणे, हे एकप्रकारे तिसर्या जागतिक महायुद्घाचे संकेत असू शकतात.
१९५५ साली तत्कालीन सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष निकीता क्रुश्चेव्ह हे भारताच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी तिबेटच्या प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात खूपच तणाव निर्माण झाला होता. भारत आणि चीन यांच्या सीमांच्या दरम्यान असलेला तिबेट हा स्वायत्त प्रदेश चीनने गिळला होता. त्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना धारेवर धरले होते. तसे पंडित नेहरू कुणाला घाबरत नव्हते. कारण, १९५२ सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमताने सत्तारूढ झालेला होता. स्वतः पंडित नेहरूंची वैयक्तिक लोकप्रियता केवळ अफाट होती. पण, त्यामुळेच त्यांना जराही विरोध सहन होत नसे. बहुधा याचा उल्लेख त्यांनी क्रुश्चेव्ह यांच्याकडे केला असावा. त्यामुळे भारत भेटीवर आलेल्या क्रुश्चेव्ह यांनी जाहीरपणे उद्गार काढले की, “तुम्ही कसलीही काळजी करू नका. सोव्हिएत संघ तुमचा मित्र आहे. या हिमालयाच्या शिखरावर उभे राहा आणि आम्हाला हाक मारा. आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ.”
ऑक्टोबर १९६२ साली चीनने आकस्मिकपणे भारतावर आक्रमण केले. साहजिकच भारताने सोव्हिएत रशियाला हाक घातली. क्रुश्चेव्ह यांनी मदतीला न येता उलट आपली अलिप्तता घोषित केली. यावर त्यांना त्यांच्या १९५५ सालच्या भरघोस भावनिक घोषणेची आठवण करून देण्यात आली. राजकारणी आणि त्यातही साम्यवादी राजकारणी किती बिलंदर असतात पाहा. क्रुश्चेव्ह भारतीय प्रतिनिधीला उत्तरादाखल म्हणाले, “आम्ही तुमचे मित्र आहोतच, पण चीन आमचा भाऊ आहे.” आता भारताचा नाईलाज झाला. भांडवलशाही देश, शोषण करणारा देश वगैरे गाळीव शिव्या देऊन, ज्या अमेरिकेचा रात्रंदिवस उद्धार करण्यात काँग्रेसवाल्यांना ब्रह्मानंद होत असे, त्याच अमेरिकेसमोर मदतीसाठी तोंड वेंगाडण्याची पाळी आली. अमेरिकेने तत्परतेने भारताला मदत केली. शस्त्रास्त्रे, अन्नधान्य, यंत्रसामग्री, शस्त्रांचे आणि यंत्रांचे सुटे भाग अशी ही मदत होती.
याचा अर्थ तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी हे मोठे दयाळू, प्रेमळ, कनवाळू वगैरे होते, असा गैरअर्थ कुणी काढू नये. चीन हा उघडच साम्यवादी म्हणजे अमेरिकेचा शत्रू होता, तर भारत कसा का असेना, लोकशाही देश होता. भारताचा पराभव होऊन तो दुर्बळ होणे आणि चीन विजयी होऊन सबळ होणे, हे अमेरिकेच्या जागतिक सत्ताकारणाच्या दृष्टीने अनुकूल नव्हते. म्हणजे कोंबड्यांच्या झुंजीत कोणताही कोंबडा मरता कामा नये. त्यांनी थोडा दम खाऊन, पुन्हा शक्ती कमावून पुन्हा झुंजले पाहिजे, झुंजत राहिले पाहिजे. त्यामुळेच ही मदत फुकट दिलेली नव्हती. फक्त सवलतीच्या दरात आणि सावकाशीने तिची परतफेड करायची होती. त्यामुळे १९६३ सालापासून पुढे जवळ-जवळ १९७० सालापर्यंत भारतातले लोक ‘मिलो’ नावाचा लाल रंगाचा अमेरिकन गहू खात होते. हा निकृष्ट प्रतीचा गहू अमेरिकेत माणसे खात नाहीत, तर डुकरांना खायला घालण्यात येतो. मदतीच्या हाकेला धावण्याची अशी एकेक गंमत असते. असो.
तर, उत्तर कोरिया या साम्यवादी देशाचा हुकुमशहा किम जाँग उन याने आपल्या दहा हजार सैनिकांची एक तुकडी रशियाच्या मदतीला युक्रेनमध्ये धाडली आहे. हे सैनिक युक्रेनमध्ये पोहोचले असून लवकरच ते प्रत्यक्ष ‘अॅक्शन’मध्ये सहभागी होतील, अशा बातम्या आहेत.
आता गंमत पाहा हं! रशिया हा एक अवाढव्य देश आहे. आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांमध्ये अफाट पसरलेल्या या देशाचे एकूण क्षेत्रफळ आहे सुमारे १ कोटी, ७०लाख चौरस किमी. लोकसंख्या आहे सुमारे १४कोटी, ३८लक्ष आणि सैन्य आहे सुमारे २० लक्ष, तर उत्तर कोरियाचे क्षेत्रफळ आहे सुमारे १ लाख, २०हजार चौरस किमी, लोकसंख्या आहे सुमारे २ कोटी, ६२लाख आणि सैन्य आहे सुमारे दहा लाख. थोडक्यात, उत्तर कोरिया हा रशियाच्या एखाद्या प्रांतापेक्षा नव्हे, जिल्ह्यापेक्षाही लहान आहे. अशा स्थितीत रशियाच्या मदतीला उत्तर कोरिया धावला, असे म्हणणे हास्यास्पद आहे. पण, प्रत्यक्षात ते तसे नाही. कारण, जेमतेम दोन-अडीच कोटी लोकसंख्येचा हा देश दहा लाखांचे सैन्य सज्ज ठेवतो. एवढेच नव्हे, तर तो अण्वस्त्र संपन्न आहे आणि सतत नवनव्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करून तो त्याचा शीवशेजारी देश दक्षिण कोरिया नि समुद्रापलीकडच्या शेजारी देश जपान यांना धमक्या देत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षपणे या धमक्या अमेरिकेला असतात. आता युके्रन युद्धात अमेरिका आणि तिचे मित्र देश युक्रेनला मदत करत आहेत. रशियात आता साम्यवादी राजवट नाही. त्यामुळे आणि अन्यही कारणांमुळे चीन निदान उघडपणे तरी रशियाला मदत करत नाही. अशा स्थितीत अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी रणभूमीवर सैनिक उतरवणे, हे एकप्रकारे तिसर्या जागतिक महायुद्घाचे संकेत असू शकतात.
जर्मनी हा देशा साधारणपणे युरोप खंडाच्या मध्यावर आहे. १९४५ साली हिटलरच्या जर्मन फौजांनी व्यापलेला एक-एक युरोपीय देश मुक्त करायला सुरुवात झाली. पश्चिमेकडून अँग्लो-अमेरिकन सेना आणि पूर्वेकडून सोव्हिएत सेना पुढे पुढे घुसत, एक एक व्याप्त देश मुक्त करत अखेर खुद्द जर्मन प्रदेशातच एकमेकींसमोर उभ्या राहिल्या. त्यामुळे अँग्लो-अमेरिकेच्या प्रभावाखालच्या पश्चिम जर्मनी आणि सोव्हिएत प्रभावाखालच्या पूर्व जर्मनी अशी जर्मनीची उभी फाळणी झाली.
कोरिया हे एक द्वीपकल्प आहे. तुम्ही शाळेतल्या भूगोलात कदाचित एक गोष्ट पाठ केली असेल-बाल्टिक समुद्रावरच्या सेंट पीटर्सबर्ग उर्फ लेनिनग्राडवरून ट्रान्स सैबेरियन रेल्वे सुरू होते आणि सुमारे दहा हजार किमी अंतर तोडून ती जपानच्या समुद्रावरील व्हलाडीवोस्टॉक या प्रसिद्ध बंदरात समाप्त होते, तर या व्हलाडीवोस्टॉक शहराजवळ चीन, रशिया आणि कोरिया या तीन देशांच्या सरहद्दी एकमेकींना भिडतात. दुसर्या महायुद्धात जर्मनीचा दोस्त असलेल्या जपानने संपूर्ण कोरिया देशासह पॅसिफिक महासागरातला फार मोठा प्रदेश व्यापला होता. जनरल डग्लस मॅक्आर्थर या प्रसिद्ध सेनापतीच्या नेतृत्वाखाली अमेरिकन नौदल आणि भूदल यांनी जपानविरुद्ध प्रचंड प्रतिचढाई सुरु केली. कोरियन द्वीपकल्प सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि शिवाय ते रशियाच्या भूमीला जोडलेले आहे, हे लक्षात घेऊन रशियानेही कोरियावर प्रतिचढाई सुरू केली. यामुळे कोरियाचा दक्षिण भाग अमेरिकेच्या ताब्यात आला, तर उत्तर भाग रशियाच्या ताब्यात राहिला. म्हणजे कोरियाची आडवी फाळणी झाली.
दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेने लोकशाही व्यवस्था आणली. त्यामुळे निवडणुका होत राहिल्या, सरकारे बदलत राहिली. जपानप्रमाणेच दक्षिण कोरिया या अमेरिकेच्या मित्राने विज्ञान-तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. १९८८ साली दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल शहराने ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषविले.
उत्तर कोरियात १९४८ साली सोव्हिएत प्रभावाखालचा राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग याची राजवट जी एकदा सुरु झाली, ती थेट १९९४ साली त्याच्या मृत्यूनेच संपली. ४६वर्षांच्या प्रदीर्घ हुकुमशाहीत उत्तर कोरियाने लष्करी विज्ञान-तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली. १९५० साली किम इल सुंगने दक्षिण कोरियावर आक्रमण करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. पण, ते जमले नाही. या कोरियन यादवी युद्धात भारताचे सैन्यपथक ‘शांतीसेना’ म्हणून गेले होते. अतिशय कर्तबगार मराठी सेनापती लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात हे या शांतीसैन्याचे प्रमुख होते. भारतीय सैन्याने आपली कामगिरी अर्थातच चोखपणे बजावली.
उत्तर कोरियाचा पहिला हुकुमशहा किम इल सुंग १९९४ साली मरण पावल्यावर घराणेशाहीच्या साम्यवादी परंपरेनुसार त्याचा मुलगा किम जाँग इल हा आपोआपच राष्ट्राध्यक्ष बनला. दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेसह लोकशाही जगाला सतत अणुयुद्धाच्या धमक्या देत राहणे, हा त्याचा आवडता छंद होता. किम जाँग इलच्या कारकिर्दीतला एक महत्त्वपूर्ण राजकीय बदल म्हणजे, तोपर्यंत सोव्हिएत रशियाबरोबर घट्ट मैत्री ठेवून असणारा उत्तर कोरिया आता अधिकाधिक चीनकडे झुकू लागला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, १९९१साली सोव्हिएत रशियाचे साम्यवादी साम्राज्य लयाला जाऊन आता तो ‘रशियन फेडरेशन’ या नावाचा लोकशाही देश बनला होता. सोव्हिएत व्यवस्थेमुळे टिकून असलेली पूर्व जर्मनी, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, रुमेनिया, बल्गेरिया इत्यादी देशांमधली साम्यवादी सरकारे लोकक्षोभामुळे उलथून पडली होती.
पण, चीनमधले साम्यवादी सरकार मात्र पूर्वीच्याच निरंकुशपणे सत्ता गाजवत होते. त्यामुळे किम इल सुंगने चीनशी जवळीक करायला सुरुवात केली आणि किम जाँग इलने ती प्रक्रिया पूर्ण केली. १७वर्षे सत्ता गाजवून २०११साली किम जाँग इल मरण पावला आणि किम जाँग उन हा त्याचा मुलगा सत्तारुढ झाला. गेली १३वर्षे तो राष्ट्राध्यक्ष आहे. नवनवीन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून लोकशाही जगाला भेडसावत राहण्याची पापाची परंपरा तोदेखील उत्तम रीतीने चालवतो आहे.
१९९९ सालापासून व्लादिमीर पुतीन हे रशियाच्या सर्वोच्च पदावर घट्ट पकड बसवून आहेत, वरकरणी त्यांची राजवट साम्यवादी नसली, तरी त्यांंची एकंदर कार्यपद्धती ही हुकुमशाहीच आहे. मुख्य म्हणजे ते अमेरिका आणि युुरोपच्या विरोधात आहेत. तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी सैन्य पाठवून आपल्या सैनिकांना प्रत्यक्ष रणांगणाचा मौल्यवान अनुभव देणे आणि राजकारणात रशियाचा मित्र म्हणवून घेणे, असे किम जाँग उनचे विविधांगी उद्दिष्ट असावे.