"दम असेल तर इथून पुढे मतदारसंघात....", सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट आक्रमक

21 Nov 2024 13:05:36
 
solapur
 
सोलापूर : (Solapur) सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ऐनवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघातील उबाठाचे अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असून येथील उबाठाचे स्थानिक नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी प्रणिती शिंदे यांना इशारा दिला आहे.
 
काय म्हणाले शरद कोळी?
 
शरद कोळी म्हणाले की, "गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील आमच्या सर्व नेत्यांकडे मागणी आहे तातडीने प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा. काँग्रेसने त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली, प्रणिती शिंदेला लाज वाटली पाहिजे, आमचे उद्धव ठाकरे आजारी असताना या लोकांनी बूट चाटण्याचं काम केले, आजारी असतानाही उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली एवढीही जाण राहिली नाही. प्रणिती शिंदेने भाजपकडून सुपारी घेतली आहे, भाजपशी हातमिळवणी केली आहे. म्हणून खासदारकीला भाजपने मदत केली म्हणून सोलापूर दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुखांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला" असा आरोप त्यांनी केला.
 
"आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचा उमेदवार तर निवडून येणारच त्यात काही वाद नाही पण या काँग्रेसवाल्यांना ठेचून काढलं पाहिजे. आपण सहन करतोय म्हणून माघार घेतोय असं यांना वाटत असेल. प्रणिती शिंदे तुला काय तुझ्या बापालाही आम्ही भीत नाही. या प्रणिती शिंदे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याची व्याजासह आम्ही परतफेड करणार, प्रणिती शिंदे यांच्यात दम असेल तर इथून पुढे मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात फिरून दाखवावे, जिथं तिची गाडी दिसेल तिथे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही", असा इशाराही कोळी यांनी दिला.
 
"तसेच मी यासंदर्भात काँग्रेसने कशी या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे, हे सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेले आहे. शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, इथून पुढे खासदारकी विसरा यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही", असा इशारा शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंना दिला आहे.
 
घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेस आणि उबाठा गटातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0