अणुशक्ती नगर : (Swara Bhaskar) बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच स्वरा भास्करचे एक वक्तव्य सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणाली की , "मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी मनात आदर असण्यासाठी तुम्ही कोणत्या जाती - धर्मात जन्माला आला याने काही फरक पडत नाही."
या निवडणुकीत स्वरा भास्करचा पती फहाद अहमद अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात आहे. यादरम्यान स्वरा आपल्या पतीच्या प्रचारासाठी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत लोकांना संबोधित करताना ती म्हणाली, “होय, हे खरं आहे की माझा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला आणि हो, हेही खरं आहे की मी एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं, आणि मला तुम्हाला अजून एक सत्य सांगायचं आहे की, मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी मनात आदर असण्यासाठी तुम्ही कोणत्या जाती - धर्मात जन्माला आला याने काही फरक पडत नाही. महायुतीचे सरकार आल्यावर मशिदींवरील लाऊडस्पीकर काढू, असे लोक सांगत आहेत. या सगळ्यात मला एवढं नक्की समजलं आहे की मुस्लिमांच्या हृदयात आणि विश्वासात इतकी ताकद आहे की त्यांना या लाऊडस्पीकरची गरज नाही, कारण अजानचा आवाज प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचतोच.”
तसेच यापूर्वी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासोबतच्या फोटोमुळे स्वरा भास्कर चर्चेत होती. अनेकदा महिलांच्या हक्कांवर बोलणाऱ्या स्वरा भास्करने स्त्रीशिक्षणाला विरोध करणाऱ्या मौलानांशी घेतलेल्या भेटीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.