सौदी अरेबियामध्ये वर्षभरात १०० विदेशी नागरिकांना फाशी

19 Nov 2024 12:53:43
Saudi Arebia

रियाध : सौदी अरेबियामध्ये ( Saudi Arebia ) यावर्षी १०० पेक्षा अधिक परदेशी लोकांना फाशी देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एका येमेनी नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दक्षिण-पश्चिमी भागात नजरानमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर, यावर्षी फाशीची शिक्षा सुनावलेल्या परदेशींची संख्या १०१ झाली आहे. सौदी अरेबियाने २०२२ आणि २०२३ मध्ये ३४ परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ‘युरोपियन-सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स’चे कायदेशीर संचालक ताहा अल-हज्जी म्हणाले की, “सौदी अरेबियाने एका वर्षात इतक्या परदेशी लोकांना फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फाशीच्या संदर्भात सौदी अरेबिया चीन आणि इराणनंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. फाशी देण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये पाकिस्तानचे २१, येमेनचे २०, सीरियाचे १४, नायजेरियाचे दहा, इजिप्तचे नऊ, जॉर्डनचे आठ आणि इथिओपियाच्या सातजणांचा समावेश आहे. सुदान, भारत, अफगाणिस्तानमधील प्रत्येकी तीन, श्रीलंका, इरिट्रिया, फिलीपिन्समधील प्रत्येकी एकाला फाशी देण्यात आली.”

Powered By Sangraha 9.0