मुंबई : “एकीकडे हिंदू बांधव जातीयवादात अडकले आहेत, तर दुसरीकडे सगळे अफजल, बाबर, तुगलक, घोरी, गझनी, औरंगझेब एकत्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे. त्यामुळे अफजलशाही विचार रोखण्याकरिता आगामी विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे.” असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय ( Ashwini Kumar Upadhyay ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेल्या संवादातून केले आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ या धरतीवर जगभरातील हिंदूंना आवाहन केले जात आहे. त्याबाबत काय सांगाल?
इतिहास यासाठी साक्ष आहे की, ज्या-ज्या ठिकाणी हिंदू संघटित नव्हते, त्या-त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार आणि हल्ले झाले. काश्मीर, अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानमध्ये हिंदू जातीवरून विभागले गेले. त्यामुळे तिथे हिंदूंची संख्येत मोठी घट झाली. मिझोराम, मेघायल, नागालॅण्ड, मणिपूर अगदी बांगलादेशातही सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतीय संविधानसुद्धा हेच सांगते की, “सर्वांनी संघटित होऊन, एकत्र येऊन राहणे.” आजच्या घडीला भारताच्या एकूण नऊ राज्याची ८०० जिल्ह्यांपैकी २०० जिल्ह्यांची तर सहा हजार तहसीलपैकी १ हजार, ५०० तहसीलची डेमोग्राफी बदलल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या सीमेवर ३०० तहसील आहेत. त्या सर्व तहसीलची डेमोग्राफी बदलली आहे. अशातच आता महाराष्ट्राला टार्गेट करून सुनियोजित पद्धतीने डेमोग्राफी बदलवण्याचा प्रयत्न होतो आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, सनातन धर्माला वाचवण्याकरिता जे युद्ध झाले ते महाराष्ट्राच्या धर्तीवर झाले. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण सर्वजण धर्मांतरीत झालो असतो. पंजाबमध्ये ड्रग्सचा वापर करून तेथील २५ टक्के लोकांचे धर्मांतरण केले गेले. नुकत्याच आलेल्या ‘टीस’च्या अहवालानुसार वाढत्या घुसखोरीमुळे मुंबईत हिंदूंची संख्या ६६ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. धारावीत ८० टक्के-२० टक्के असा रेशियो होता, तोच आता २० टक्के-८० टक्के झाला आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा धोका आहे. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे. डेमोग्राफीमध्ये जो गंभीर बदल होतोय, त्याला थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यातील ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’च्या घटनांकडे आपण कसे पाहता?
देशात ‘पॉप्युलेशन जिहाद’, ‘धर्मांतरण जिहाद’, ‘घुसखोरी जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ सारख्या गोष्टी मोठ्याप्रमाणात घडत आहेत. कोल्हापूरच्या एका सैन्य अधिकार्याच्या दोन मुलींपैकी एका मुलीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासंदर्भात जनहित याचिका (पीआयएल) जेव्हा दाखल झाली, त्यानंतर त्याबाबत रिसर्च सुरु झाला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, महाराष्ट्रातून गेल्या तीन वर्षांत एक लाख मुली बेपत्ता झाल्या आहेत, ही गंभीर बाब आहे. जेव्हा एखाद्या मुलीचे आयुष्य संपते, तेव्हा पुढची संपूर्ण वंशावळ संपुष्टात येते. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ हा राष्ट्रसुरक्षेला, देशाच्या एकता-अखंडतेला एकप्रकारे धोका आहे. “धर्मांतरीत हिंदू हेच हिंदूंचे खरे वैरी आहेत,” असे स्वामी विवेकानंद स्वतः म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मग ‘लव्ह जिहाद’ करणार्यांविरोधात ‘यूएपीए’, ‘मकोका’, ‘देशद्रोहा’सारखे कायदे लावले गेले पाहिजेत आणि अशा आरोपींना जे पाठीशी घालतात त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला हवी.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘व्होट जिहाद’च्या मुद्याकडे आपण कसे पाहता?
सुरुवातीला ‘व्होट जिहाद’ छुप्या पद्धतीने केला जात होता. आता तो खुलेआम केला जातोय. पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत, फतवे निघतायत. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारच्या जितक्या योजना आहेत, त्यांचा ३५ ते ३६ टक्के लाभ गैरहिंदू घेतायत. असे असतानाही त्यांनाच भाजप विरोध करत एआयएमआयएम, समाजवादी पक्ष, महाविकास आघाडीला मतदान करा म्हणून सांगितले जात आहे. हा देखील ‘व्होट जिहाद’च आहे.
मुंबईतील वाढत्या घुसखोरीवर तुमचे मत काय आणि यावरून मुंबईकरांना काय आवाहन कराल?
जनतेने जर मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान केले नाही आणि सुट्टी साजरी केली, तर सर्वांचे भविष्य धोक्यात आहे. सगळे अफजल, बाबर, तुगलक, घोरी, गझनी, औरंगझेब एकत्र झाले आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, छत्रपती संभाजी महाराज सनातन धर्माचे रक्षण करत होते. म्हणून त्यांना ४० दिवस हाल हाल करून मारण्यात आले. आज त्यांच्याच भूमीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. ते अफजलशाही विचार समाजासाठी आज घातक आहेत. ती रोखण्यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित नसेल, हे नक्की.
भारतीय संविधानाने हिंदू म्हणून काय दिले?
हिंदुत्व म्हणजे समानता, न्याय, स्वातंत्र्य; हिंदुत्व म्हणजे सर्वांना लिहिण्याचे, विचार करण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य. पाकिस्तान, अफगाणिस्तानात असे स्वातंत्र्य कोणालाच नाही. एकीकडे भारतात आपण रामायण, महाभारतावर चर्चा करू शकतो. संतांच्या साहित्यांवर चर्चा करू शकतो. तेच जर पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या शासनामध्ये अशा विषयांवर चर्चा केली तर आपला शिरच्छेद केला जाईल. अमरावतीत उमेश कोल्हे नामक तरुणाची हत्या, ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या मुलींची हत्या त्यांची जात पाहून नाही, तर ते केवळ हिंदू होते म्हणून करण्यात आली होती. हे सर्व समजून घेण्याची वेळ आली आहे. त्याकरिता देशात कठोर कायदे आणि त्यांची त्वरित अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. या सर्व मुद्दांवरून आपल्याला कोण न्याय देऊ शकेल? याचा विचार करून मतदारांनी योग्य व्यक्तीला मतदान करणे महत्त्वाचे आहे आणि विरोधकांना आरसा दाखवण्याची आता वेळ आली आहे.