‘एक हैं तो सेफ हैं’ हे राष्ट्रवादावर विश्वास ठेवणार्‍यांसाठी : पीयूष गोयल

18 Nov 2024 12:17:02
Piyush Goyal

मुंबई : “एक हैं तो सेफ हैं’ हे त्यांच्यासाठी आहे, जे राष्ट्रवादावर विश्वास ठेवतात. हे कोणत्याही धर्माबद्दल नाही,” असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ( Piyush Goyal ) यांनी व्यक्त केले. तसेच, “हे उल्लेखनीय आहे की, देशातील सर्वाधिक चार्टर्ड अकाऊंटंटची लोकसंख्या उत्तर मुंबईत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

दहिसर येथे सीएंसोबत संवाद साधताना ते म्हणाले की, “जसे हरियाणाने महायुतीच्या बाजूने मतदान केले, तसेच महाराष्ट्रही महायुतीला निवडेल. मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडू शकले नाहीत. परंतु, यावेळी मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्यास तयार आहेत,” असा विश्वासही व्यक्त केला.

पीयूष गोयल म्हणाले की, “भारत भ्रष्टाचारमुक्त सार्वजनिक लाभाच्या योजनांची आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याकडे पुढे जात आहे. यामध्ये सीएंची मोठी भूमिका आहे, जे देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक पैसा योग्य ठिकाणी खर्च होईल, याची खात्री करतात. देशातील तरुण पिढी मोठे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि हे शतक भारताचे आहे.” स्थानिक विकासाबाबत पीयूष गोयल म्हणाले की, “बोरिवली ते कोकणसाठी नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, कोस्टल रोडचा विस्तार भाईंदरपर्यंत केला जात आहे. त्यासाठीची निविदा पूर्ण झाली असून पर्यावरण मंजुरीही मिळाली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “मुंबईला ‘तिहेरी इंजिनची सरकार’ आवश्यक आहे, ज्यामध्ये केंद्र, राज्य आणि नगरनिगम एकाच ऊर्जेने काम करतील,” असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0