अर्थशक्तीची झेप

    18-Nov-2024
Total Views | 45

economic growth
 
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.२ टक्के इतका राहील, असा अंदाज ‘मूडीज’ने वर्तवला आहे. देशांतर्गत महागाईचा प्रभाव कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे, असेही तिने म्हटले आहे. जागतिक आव्हानांचा विचार करता, जगाला प्रेरणा देणारे असे हे भारताचे यश आहे, असे म्हणता येते.
 
महागाईचा प्रभाव कमी झाल्याने, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा ७.२ टक्के राहील, असा अंदाज ‘मूडीज रेटिंग्ज’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. ‘मूडीज’ने २०२५ आणि २०२६ मध्ये भारताचा वाढीचा दर अनुक्रमे ६.६ टक्के आणि ६.५ टक्के असेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून, भारताचा वाढीचा दरही दमदार असणर आहे, असे निरीक्षण ‘मूडीज’ने नोंद केले आहे. नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या हंगामातील जोरदार मागणी, तसेच देशात झालेल्या चांगल्या मान्सूनमुळे ग्रामीण भागात वाढलेला खर्च यामुळे वाढीला चालना मिळत आहे, असेही एक निरीक्षण आहे. देशात झालेली चांगली पेरणी आणि पुरेसा अन्नधान्यसाठा यामुळे महागाई नियंत्रणात येत आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ज्या उपाययोजना राबवत आहे त्या पुरेशा आहेत, असे यातून म्हणता येते. त्याचवेळी महागाईचा सध्याचा ६.२१ टक्के हा दर भूराजकीय संघर्ष आणि हवामानाची तीव्र परिस्थिती यामुळे आहे, असे म्हणावे लागेल. मध्यवर्ती बँक तो नियंत्रणात आणण्यास सक्षम असल्यामुळेच अन्य कोणी त्याची चिंता करावी, अशी परिस्थिती नक्कीच नाही.
 
भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा वाढते, तेव्हा ती जागतिक वाढीला हातभार लावते, असे वारंवार म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जेव्हा ७.२ टक्के असेल असे ‘मूडीज’ म्हणते, तेव्हा म्हणूनच ती चांगल्या अवस्थेत असल्याचे निरीक्षण ती नोंद करते. जागतिक वाढीत भारताचा वाटा हा १६ टक्के इतका राहिला आहे. जगाच्या वाढीचा दर ३.२ टक्के इतका असताना, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा जगातील सर्वाधिक वाढीचा ठरला आहे. मध्य-पूर्वेतील तणावाची स्थिती तसेच रशिया-युक्रेन संघर्ष हा संपूर्ण जगासाठी चिंता वाढवणारा ठरला. जगभरात त्यामुळे महागाईचा भडका उडाला. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात तशी परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमध्ये रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवत, पतधोरणात बदल न करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. यापुढेही रेपो दरात कोणता दिलासा मिळेल, अशी शक्यता आजतरी दिसत नाही.
 
जागतिक पातळीवरील आव्हानांना न जुमानता, भारताने केलेली मजबूत आर्थिक कामगिरी भारतीय अर्थव्यवस्थेचे सातत्य दाखवणारी ठरली आहे. भारत हा जागतिक पातळीवर सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणूनच स्थान मिळवणारा ठरला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘मूडीज’च्या मते ही शाश्वत वाढ प्रामुख्याने, घरगुती वापरातील पुनरुज्जीवनावर आधारित आहे. कोरोनामुळे तसेच त्यानंतरच्या चलनवाढीच्या दबावामुळे झालेल्या आर्थिक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर, भारतीय ग्राहकांनी हळूहळू त्यांचा खर्च वाढवणे अपेक्षित होती. ग्राहकांच्या मागणीत झालेली ही वाढ विविध क्षेत्रांतील आर्थिक क्रियाकलापांना चालना देत आहे. यात विशेषत्वाने उत्पादन आणि रोजगार यांचा उल्लेख करावा लागेल. ग्राहकांची वाढलेली क्रयशक्ती तसेच ग्राहकांचा वाढलेला आत्मविश्वास आणि केंद्र सरकारचे धोरण सातत्य यांचा हा एकत्रित परिणाम आहे.
 
भारताची आर्थिक वाढ सातत्याने मजबूत राहिली आहे. अलीकडच्या वर्षांत ती सरासरी सात टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ‘मूडीज’ने त्यासाठीचा अंदाज जास्त वर्तवला आहे. देशाचा वाढता मध्यमवर्ग, वाढत्या शहरीकरणासह, देशांतर्गत वापराला चालना देणारा ठरत असून, तो आर्थिक विस्तारालाही चालना देतो. त्याशिवाय, पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने दिलेले विशेष लक्ष, मेक इन इंडियासारखे उपक्रम देशांतर्गत उत्पादनाला बळ देत असून, शाश्वत वाढीस हातभार लावत आहेतच, त्याशिवाय ते विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे ठरले आहेत. भारत एक तरुण आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या असून, हा एक महत्त्वपूर्ण लोकसंख्याशास्त्रीय फायदा आहे. हा लाभांश देशातील उत्पादकता वाढवतो तसेच, आर्थिक वाढीला चालना देतो. तरुण लोकसंख्या जगातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारपेठेचेदेखील प्रतिनिधित्व करते, ज्यामुळे देशांतर्गत मागणी आणखी वाढते.
 
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात सरकारच्या संरचनात्मक सुधारणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ‘वस्तू आणि सेवा कर’ च्या अंमलबजावणीने देशाच्या खंडित कर प्रणालीला एकत्र केले. व्यवसाय प्रणाली सुलभ केली. तसेच आर्थिक एकात्मतेला प्रोत्साहन दिले. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात केंद्र सरकारच्या धोरणांचा मोठा वाटा आहे. भारत वेगाने डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारत असून, ई-कॉमर्स, फिनटेक आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी वाढ नोंद होत आहे. ही डिजिटल क्रांती कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी निर्माण करणारी ठरत आहे. ‘एस अ‍ॅण्ड पी’चा अंदाज भारताचे जागतिक वाढीतील योगदान ठळकपणे मांडणारा ठरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख खेळाडू म्हणून भारत उदयास येत आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.
 
जागतिक बँकेनेही भारताच्या वाढीबद्दल सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून गौरवले आहे. भारताची वाढ ही तरुण लोकसंख्या, देशातील वाढता मध्यमवर्ग आणि वाढते शहरीकरण यांसारख्या कारणांमुळे होत असल्याचे, जागतिक बँकेने म्हटले आहे. विकासात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी, विकासदर चढा राखण्याच्या महत्त्वावर जागतिक बँकेने भर दिला आहे. व्यावसायिक वातावरण सुधारण्याच्या उद्देशाने राबवलेल्या विविध आर्थिक सुधारणांसाठी, जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. जागतिक बँक भारताकडे वाढीची अफाट क्षमता असलेला देश म्हणून पाहत असून, वित्तीय संस्था भारताच्या वाढीवर शिक्कामोर्तब करत आहेत, असे निश्चितपणे म्हणता येते.
 
जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम असली, तरी यात लवकरच सुधारणा होईल, अशा घडामोडी घडत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थाही मंदीतून बाहेर पडेल, असे संकेत मिळत आहेत. म्हणूनच, भारतीय अर्थव्यवस्थेने कायम राखलेले यश हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असेच आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121