नागपूर : महाराष्ट्रात महायुती १६५ जागांवर विजयी होणार असून महाराष्ट्रात मजबूत सरकार येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-महायुतीचा जाहीरनामा मान्य केला असून कॉंग्रेसचा जाहीरनामा धुळखात पडला आहे, तो कुणीही मान्य करीत नाही. कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.
सोमवारी सकाळी कोराडी येथे ते माध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण, शेतकरी कल्याण यासह वीज बिलात ३० टक्के कपात व लाडकी बहीण योजनेसह महायुती २५ महत्वाच्या विषयावर काम करणार आहे. वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली भाजपा-महायुतीची जाहिरात खरी असून मविआची जाहिरात ही खोटी आहे. जाहिरातीशिवाय ते काहीच करू शकत नाही. महायुतीची बरोबरी साधू शकत नाही. मविआमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. चार महिन्यातच जनतेने कॉंग्रेसची साथ सोडली. हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
शरद पवार यांनी विकासावर बोलावे
शरद पवारांच्या नादी लागण्याची आम्हाला गरज नाही. त्यांचे काम त्यांनी करावे, आम्ही आमचे काम करू, आमच्याकडे मोदी सरकारचे आणि महायुती सरकारचे काम आहे. ईडी-सीबीआयचे रडगाणे आता पुरे झाले. आता त्यांनी विकासावर बोलावे, असाही टोला त्यांनी लगावला.
कामठीच्या जनतेशी कौटुंबिक संबंध
कामठी मतदारसंघातील दीड लाख कुटुंबांशी माझे पारिवारिक संबंध आहेत. मी केवळ साधा प्रवास करीत आहे, कामठीची जनता माझ्या पाठिशी आहे. त्यांना विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे पाच वर्ष मतदारसंघाचा विकास करतील. धर्म, संस्कृती, संस्कार यासाठी काम करणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी दिला.