संजय केळकर या जनसेवकाला विजयी करण्याचे प्रचाररॅलीतून आवाहन
17-Nov-2024
Total Views |
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना उमेदवारांनी प्रचार रॅली आणि जाहीर सभांवर भर दिला आहे. त्यातच शेवटच्या शनिवारी, दि. १६ नोव्हेंबर रोजी ठाणे शहर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी सायंकाळी मोठ्या दणक्यात प्रचार रॅली काढली.
रॅलीत महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळींनी सहभागी होत केळकर ‘साहेब आगे बढो... हम तुम्हारे साथ है.., आपला माणूस.. हक्काचा माणूस...’ तसेच ‘जय जय श्रीराम...’ अशा घोषणा दिल्या. दणक्यात काढलेल्या या रॅलीत ठाणेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ’कमळ’च पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत होते.
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनसमोरील दादा पाटीलवाडी येथून केळकरांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, नारायण पवार, प्रतिभा मढवी, डॉ. राजेश मढवी, भास्कर पाटील, रमेश सांगळे, किरण नाकती आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिलावर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी केळकर यांची भेट घेणार्या ठाणेकर नागरिकांनी, ‘साहेब आपणच आमदार होणार’, असा विश्वास व्यक्त केला.
चौक, सोसायट्या, मंडळे याठिकाणी महिलांनी केळकर यांचे औक्षण केले. ठाणेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरलो आहे. कमळ चिन्हाचे बटन दाबून या जनसेवकाला विजयी करा, असे आवाहन संजय केळकर यांनी समस्त ठाणेकरांना केले.
‘वृत्तपत्र विक्रेता सेने’चा जाहीर पाठिंबा
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर तिसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्हा ‘वृत्तपत्र विक्रेता सेने’ने संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी प्रचार करून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे ‘वृत्तपत्र विक्रेता सेने’ने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
स्वच्छ, निष्कलंक उमेदवार असलेल्या संजय केळकर यांचा प्रत्येक ठाणेकराला अभिमान असून त्यांच्याबद्दल आत्मियता आहे. ते आमदार असून सुद्धा सर्वसामान्य माणसाला वेळ देतात, कुठलीही अडवणूक न करता प्रत्येकाच्या समस्या मार्गी लावतात. तसेच कुठलाही बडेजाव नसणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही केळकर यांनी अनेकवेळा सहकार्य केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबाबत केळकर यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवल्याने ही मागणी महायुती सरकारने मान्य केली आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला ठाणे जिल्हा ‘वृत्तपत्र विक्रेता सेने’ने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
ठाणे जिल्हा ‘वृत्तपत्र विक्रेता सेना’ अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, दीपक सोंडकर, चेतन चाळके, सचिन सावंत, दिनेश रौनक यांच्यासोबत ठाणे शहर ‘वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन’चे अध्यक्ष दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.