भाजपाला एक मत म्हणजे महाराष्ट्राचा विकास!

17 Nov 2024 21:30:09
Bawankule

नागपूर : भाजपा-महायुतीला दिलेल्या एका मतामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल.. आपलाच मुख्यमंत्री, आपलाच पालकमंत्री, आपलाच उमेदवार विजयी होणार आहे. भाजपाला मिळणारे एक मत महाराष्ट्र येथील १४ कोटी जनतेचा विकास साधणारे असेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी केले.

रविवारी (१७ नोव्हें) ते केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार चरणसिंग ठाकूर तसेच सावनेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या निवडणूक प्रचार सभांमधून बोलत होते. श्री बावनकुळे यांनी प्रत्येक मतदारांनी तीन घरांची जबाबदारी स्वीकारून भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महायुतीमध्ये सध्या २१८ आमदार आहेत. ते सर्व निवडणुकीत आहेत. सरकार बनविण्यासाठी १४४ आमदारांची गरज आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार येणार हे निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्राच्या सर्वंकष विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

काटोल येथील सभेत आमदार डॉ. परिणय फुके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, राजू हरणे, उकेश चौहान, दिनेश ठाकरे, विजय महाजन, नरेश अरसड तर सावनेर येथील सभेत डॉ. राजीव पोतदार, अशोक मानकर, अशोक धोटे, रमेश मानकर, विश्वास पाठक, प्रकाश टेकाडे, मनोहर कुंभारे, किशोर चौधरी, संजय टेकाडे यांच्यासह मोठ्या संख्येन भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व काटोल व सावनेर विधानसभा क्षेत्रातील मतदार उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0