येत्या पाच वर्षात मुलुंडचा चेहरामोहरा बदलणार! आमदार मिहीर कोटेचा यांचा विश्वास

    17-Nov-2024
Total Views |
 
Mihir Kotecha
 
मुंबई : पुढच्या काही वर्षात मुलुंडमध्ये पाच मोठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल, असा विश्वास स्थानिक आमदार आणि महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये रेल्वे टर्मिनस, क्रिडा पार्क, पक्षी उद्यान, तीन डीपी रोड आणि रोपवे (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे.
 
याबाबत बोलताना मिहीर कोटेचा म्हणाले की, "मुलुंडमध्ये तीन डीपी रोड मंजूर झाले आहेत. या नव्या रोडमुळे शहरातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. मुलुंडमध्ये साडेचार एकरावर पक्षी उद्यान होत असून सिंगापूरच्या धर्तीवर होणाऱ्या या पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या पर्यटनस्थळात नव्या स्थळाची भर पडणार आहे. सरदार प्रतापसिंह गार्डच्या टेकडीवर केबल कार बनवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुलसी तलावाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येणार आहे. मुलुंडला क्रिडा कॉम्प्लेक्स बनवण्यात येत असून सर्व आऊटडोअर खेळांची सुविधा येथे असणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
"स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलुंडच्या या स्वतंत्र टर्मिनसमुळे मध्य रेल्वेचा ताण कमी होईल. तसेच कच्छ, उत्तर प्रदेश आणि कोकणमध्ये जाणाऱ्यांना मुलुंडमधूनच एक्सप्रेस रेल्वेगाड्या पकडता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "मुलुंडमध्ये आज बहुसंख्येने मॉल्स आहेत. पण, पुढच्या पाच वर्षाच्या आत सदर पाच प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मुलुंड हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनेल. मुलुंडमधील रहिवाशांना विकेंडला दूर जाण्याची गरज लागणार नाही. येथील वाहतुक कोंडी संपुष्टात येईल. स्थानिक खेळाडूंना येथे सुविधा मिळेल आणि येथील पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल," असे मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले.
 
आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपच्या पहिल्या यादीत मुलुंडमधून महायुतीची विधानसभा उमेदवारी जाहीर झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधून ५६ टक्के मते मिळवत तब्बल ५७ हजार ३४८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. कोटेचा हे भाजपमध्ये तीन दशके सक्रीय असून ते भाजपचे प्रदेश खजिनदार आहेत.
 
मुलुंडमध्ये होणारे ५ प्रकल्प पुढीलप्रमाणे :
 
१. साडेचार एकर क्षेत्रावर सिंगापूरच्या धर्तीवर पक्षी उद्यान.
२. सरदार प्रतापसिंह गार्डन पासून रोपवे.
३. मुलुंड पूर्व येथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स.
४. स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनस.
५. तीन नवे डीपी रोड.