आधुनिक वाल्मिकी गदिमांची रामकथा - गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय!

    16-Nov-2024
Total Views |
geetramayan gadima


मराठी माणसाच्या भावविश्वात संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’, समर्थ रामदासांचे ‘दास रामायण’, संतकवी श्रीधरांचा ‘रामविजय’ या रामकथांना अनन्य असे स्थान व मान आहे. अशा मराठी मनावर आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीतरामायणा’चे गारूड गेली 69 वर्षे अधिराज्य करीत आहे. गदिमांचे मंत्रासारखे आशयघन शब्द आणि स्वरतीर्थ सुधीर फडकेंचा देवगंधर्वासम आवाज-सूर यांनी एका अजरामर, अवीट, संस्मरणीय कलाकृतीचा जन्म झाला आणि प्रभु श्रीराम त्यांची अधिष्ठान देवता आहे. रामकथाकारांच्या वैभवी परंपरेत ‘गदिमा’ ही नाममुद्रा ध्रुवासारखी अढळ आहे.

रघुराजाच्या नगरी जाऊन
गा बाळांनो, श्रीरामायण ।
अयोध्येच्या राजदरबारात रघुकुलतिलक श्रीरामांनाच त्यांच्या अपरिचित पुत्रांनी रामायण ऐकवण्याचा अपूर्व असा नाट्यपूर्ण प्रसंग योजून कवीवर्य ग.दि. माडगूळकर यांनी आपल्या ‘पटकथा लेखक’ म्हणून असलेल्या कौशल्याचा परिचय घडवत, गीतरामायणाचा श्रीगणेशा केला. ‘स्वये श्री राम प्रभु ऐकती । कुशलव रामायण गाती ।’ या ओळी आकाशवाणीवरून मराठी रसिकांच्या कानी पडल्या आणि सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले. रामकथेच्या अमृतस्वरांनी देहभान विसरून राममय झाले.

भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील ही संस्मरणीय गोष्ट आहे. इ.स. 1955 साली आकाशवाणीने उपक्रमशील अधिकारी सीताकांत लाड यांनी नव्या नव्या कार्यक्रमाच्या शोधात असतानाच, रामनवमी ते रामनवमी असा वर्षभर, रामायणातील गीतांचा कार्यक्रम करावा अशी कल्पना त्यांचे जिवलग मित्र गीतकार गदिमांना सांगितली व गीतलेखनाचा मित्र हट्ट केला. गदिमांनी त्यास होकार दिला. त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनाच आग्रहाने संगीताची जबाबदारी दिली गेली आणि 1955 सालच्या रामनवमीच्या मुहूर्तावर ‘गीतरामायण’ प्रसारणाचा शुभारंभ झाला. रामनवमी ते रामनवमी संपूर्ण वर्षभर दर रविवारी एक गीत याप्रमाणे 56 गीतांनी त्या अविस्मरणीय अशा गीतरामायणाची 1956 साली रामनवमीदिनीच सफल सुफल सांगता झाली. मराठी शारदेच्या दरबारात गदिमा-सुधीरबाबुंच्या ‘गीतरामायणा’ची सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली.

सामवेदसे बाळ बोलती ।
सर्गामागून सर्ग चालती ।
सचिव मुनीजन स्त्रिया डोलती ।
आसवे गाली ओघळती ॥
ही आसवे, सानंदाश्रू, हीच गीतरामायणाची फलश्रुती व पसंतीची पावती होती.
कवीवर्य गजानन दिगंबर माडगूळकर यांचा महामहोपाध्याय द.वा.पोतदार यांनी ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरव केलेला आहे आणि गदिमांच्या एकूण धवल कारकिर्दीकडे पाहता तो सार्थ व समर्पक ठरतो. आपल्या गीतरामायणाची प्रेरणा, लहानपणी मनावर झालेले संतकवी श्रीधर यांच्या ‘रामविजय’चे संस्कार आणि कवीवर्य मोरोपंतांची 108 रामायणे, असल्याचे स्वतः गदिमांनीच एका लेखात स्पष्टपणे सांगितलेले आहे. एक संतकवी (श्रीधर) आणि एक पंडितकवी (मोरोपंत) अशा भाव व बुद्धिचातुर्य यांचा संगम आपणास गदिमांच्या गीतरामायणात दिसतो. एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’ रामदासांचे ‘दासरामायण’, श्रीधरांचा ‘रामविजय’, मुक्तेश्वरांचे ‘संक्षेप रामायण’ अशा सर्व मराठी रामायणातील नवनीत, गदिमांच्या प्रतिभेतून गीतरामायणामध्ये अक्षररूप घेऊन अवतरलेले आहे. अर्थात मूळ ‘वाल्मिकी रामायणा’सह अनेक रामायणांचा गदिमांचा व्यासंग होता. सर्वातून जे जे गदिमांच्या कवी मनाला भावले ते ते त्यांनी गीतरामायणातून शब्दांकित केले. गदिमांचे गीतरामायण एवढे लोकप्रिय ठरले की, त्याची गुजराती, बंगाली, हिंदी, कन्नड, तेलगू, संस्कृत, सिंधी, आणि इंग्रजी भाषांमध्ये समश्लोकी भाषांतरे झाली आहेत. ‘गीतरामायणाचा’ सुवर्ण महोत्सव (2005) माजी पंतप्रधान अटलबिहारींच्या उपस्थितीत झाला.

गीतरामायण ही मराठी माणसांच्या भावविश्वातील मर्मबंधाची ठेव आहे. तसेच गदिमांची अक्षरकाव्यकृती आहे. गदिमांच्या शब्दसाधनेला प्राप्त झालेले ते अमृतफळ आहे. ‘रामकथा’ हे ईश्वर रूपास प्राप्त झालेल्या पुरुषार्थी योद्ध्याचे जीवनकाव्य आहे. ते स्वयं काव्य असल्याने ते प्रत्येकाला काव्याची प्रेरणा देते. म्हणून मैथिलीशरण गुप्ता म्हणाले की - ‘राम तुम्हारा चरित्र स्वयं काव्य है । कोइ कवी बन जाय, सहज संभव है ।’

‘चरित्रम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् ।’ अशा अर्णवासम अफाट चरित्राचे गदिमांनी केवळ 56 गीतामध्ये समग्र भावदर्शन घडवलेले आहे. रामयणातील 27 पात्रे, व्यक्तिरेखा निवडून त्यांच्या तोंडी गदिमांनी आपली गीते रचली आहेत. श्रीराम हा चरित्रनायक त्यांच्या तोंडी दहा गाणी, सीतेच्या तोंडी आठ, लवकुश तीन, कौसल्येच्या तोंडी तीन आणि बाकी सर्व दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, हनुमान, शूर्पनखा यांच्या तोंडी एकेक गीत, अशी गदिमांनी चित्रपट-नाटकासारखी गीतरामायणाची सुसूत्र व सुबद्ध गीतरचना केलेली आहे. बाबुजींनी या 56 गीतांना एकूण 36 वेगवेगळ्या रागांमध्ये संगीतबद्ध करून भारतरत्न लता मंगेशकरांसह अनेक नामवंत गायकांकडून त्याला सुस्वर केले. असे ‘गीतरामायण’ महाराष्ट्राचे संस्मरणीय असे सांस्कृतिक वैभव आहे, अमृताचा अक्षय्य ठेवा आहे.

‘गीतरामायण’कार गदिमांच्या गीतलेखनामध्ये संत ज्ञानोबा-तुकोबा या संत कवींच्या, मोरोपंतांसारख्या पंडितकवींच्या आणि होनाजीबाळा, सगनभाऊ या शाहिरी कवींच्या संस्कारांचा विलोभनीय संगम आहे. एके ठिकाणी स्वतः गदिमांनीच म्हटले आहे की -
ज्ञानियांचा अन् तुकयाचा,
वंश अमुचा एक आहे ।
माझिया रक्तात थोडा,
ईश्वराचा अंश आहे ।
गदिमांचे गीतरामायण अफाट लोकप्रिय झाले. पण, गदिमांनी या सार्‍याचे श्रेय महाकवी वाल्मिकींनाच दिले. वाल्मिकी-व्यास या आर्ष महाकवींबद्दल गदिमांच्या मनीमानसी अपार श्रद्धाभाव होता. रामायणाचे श्रेय वाल्मिकींना देताना गदिमा म्हणतात -

निर्मिती मुनी वाल्मिकींची,
कथा ही रामजानकीची ।
गदिमा हे चित्रपट गीतकार, पटकथा, संवाद लेखक म्हणून सिद्धहस्त होते. त्यामुळे कोणताही प्रसंग-घटना ते गीतामधून एखाद्या कुशल चित्रकारासारखी शब्दमूर्त करतात. गीतरामायणातील प्रत्येक गाणे श्रोत्यांपुढे रामायणातील ते ते प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहत आहोत अशा समर्थपणे त्यांनी शब्दांनी चितारलेले आहे. ही शब्दचित्र उभे करण्याची त्यांची शब्दकिमया, हीच त्यांच्यावरील रामकृपेची साक्ष आहे. गीतरामायण हे केवळ गीतांचा संग्रह नाही, तर तो प्रभू रामाचाच गदिमांना साक्षात्कार युक्त लाभलेला अक्षर कृपाप्रसाद आहे. गदिमांनी म्हटल्याप्रमाणे हा देवकृपेचा वरूण वर्षाव आहे. गदिमांचे पुत्र श्रीधर यांच्या मते गदिमांनी विद्यार्थी काळात औंध (सातारा) येथे संग्रहालयामध्ये चित्ररूप रामायण पाहिले होते. त्या चित्रांचा अभंग ठसा त्यांच्या मनावर सतेज होता. थोडक्यात गदिमांचे गीतरामायण म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’ आहे.
गदिमांनी गीतरामायणाचा समारोपही नाट्यमय पद्धतीने केलेला आहे. समारोपाच्या ‘गा बाळांनो श्रीरामायण’ गीतात स्वतःच म्हणतात ‘काव्य नव्हे हा अमृतसंचय’.

 
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात : संतकवी दासगणूंचे रामजन्म आख्यान)