नेरळमध्ये उघड्या ‘डीपी’ला लहानगा चिकटला

15 Nov 2024 13:51:09
DP

नेरळ : नेरळ कुंभार आळी येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ खेळत असलेला मनीष धर्मेश पाटील ( Manish Patil ) हा अल्पवयीन मुलगा हरवलेला चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकल्याने त्याला शॉक लागून तो तेथेच चिकटला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याची कशीबशी सोडवणूक केल्याने मोठा अनर्थ टळला.

मनीष पाटील (रा. बदलापूर) हा साधारण १३ ते १४ वर्षांचा मुलगा गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास शिवाजी महाराज मैदानाजवळ चेंडू खेळत होता. यावेळी त्याचा चेंडू येथील मारूती मंदिराला लागून असलेल्या रोहित्राजवळच्या उघड्या डीपीमध्ये गेला. तो चेंडू आणायला गेलेला मनीष डीपीवर अडकल्याने, त्याला विजेचा जबर धक्का बसून तो सुमारे दीड मिनिटे तेथे चिकटला. नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढले, तेव्हा मनीषची शुद्ध हरपली होती. त्याला तातडीने नेरळ, खांडा येथील धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हेमंत शेवाळे यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला बदलापूर येथे पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनीषला तातडीने बदलापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

मनीषवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असली, तरी त्याला तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे नेरळ शहरातील उघड्या डीपीची समस्या ऐरणीवर आली असून ‘महावितरण’च्या एकूण कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच नेरळ शहरातील धोकादायक बनलेल्या विजेच्या खांबांबद्दल वारंवार तक्रारी करूनही त्याची गांभीर्‍याने दखल घेतली जात नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0