मंगलजींचा सहा टर्म विजय, हे जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे प्रतीक : जे. पी. नड्डा

14 Nov 2024 14:43:17

j p nadda
 
मुंबई : (J. P. Nadda) मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या मतदारसंघाचे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ‘प्रोफेशनल मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चगेट येथील ‘गरवारे क्लब’मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
 
व्यावसायिक, वकील, डॉक्टर, एमबीए, इंजिनीयर, सीए अशा विविध पेशातील तसेच निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणार्‍या आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणार्‍या नागरिकांची भेट घेणे, त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आणि महाराष्ट्रात भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आज देशाच्या प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे आणि या योजनांचा प्रत्यक्ष फायदा लाखो कुटुंबांना होत आहे. पूर्वी विभाजनाचे, जातीपातीचे राजकारण होते. आज विकासाचे राजकारण आहे. संपूर्ण जगातील बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या असताना आज भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि सक्षम आहे व याची दाखल जगाने घेतली आहे.” मलबार हिल मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार लोढा यांच्याबद्दल बोलताना नड्डा म्हणाले की, “आज कोणत्याही मतदारसंघातून सहा वेळा निवडून येणे हे काही सोपे काम नाही. मंगलजींचा विजय हे त्यांना जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कौशल्य विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मलबार हिलच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपण त्यांच्यावर विश्वास दाखवावा ही विनंती करतो.” यावेळी लोढा यांनी जे. पी. नड्डा यांचे आभार व्यक्त केले, तसेच उपस्थित नागरिकांचेदेखील आभार व्यक्त केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0