मतदान करा आणि मिळवा भरघोस सूट ; मुंबईत मतदात्यांसाठी विविध ऑफर

14 Nov 2024 15:29:21


vote


मुंबई, दि.१४ :  
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाचा दिवस आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण जोर लावला असून वेगवेगळ्या स्तरांवर उपाययोजना तसेच व्यापक स्तरावर जनजागृतीदेखील केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी, मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवण्यासाठी मुंबई महानगरातील अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समुहदेखील पुढे आले आहेत. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, अशा आशयाच्या थेट योजनाच जाहीर करून या सर्वांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई महानगरात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढावे यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याकरिता प्रशासनासोबतच आता वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूह हेदेखील मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये आपआपल्यापरीने हातभार लावत आहेत. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध संघटना, संस्था आणि समूहांनी थेट सवलती जाहीर केल्या आहेत.

मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवा आणि दि. २०, २१,२२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या या सवलती आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली 'आहार' संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापना यांनीदेखील आपआपल्या स्तरावर ग्राहकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. स्थानिक परिसरामध्ये देखील लहानसहान दुकाने, आस्थापना, व्यावसायिक यांनीदेखील अशा स्वरूपाच्या सवलती घोषित केल्या आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध सेवासुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. आता अवघ्या आठवडाभरावर येवून ठेपलेल्या मतदानामध्ये मतदारांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवावा, साप्ताहिक सुट्या व मतदानाची सुटी यांना जोडून सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0