शरद पवार यांचे छायाचित्र वापरू नका

13 Nov 2024 18:47:39
Sharad Pawar

नवी दिल्ली : पुढच्या आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे संस्थापक शरद पवार ( Sharad Pawar ) यांची छायाचित्रे किंवा व्हिडिओ वापरू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने "स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका" असा सल्ला अजित पवार यांना दिला. न्यायालयाने म्हटले की, अजित पवार गटाने वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज असून त्या आधारावर पक्षाने निवडणूक लढवावी. निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नयेत, असे आदेश पक्षाने आपल्या नेत्यांना द्यावेत.

शरद पवार गटाची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनीही ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह शरद पवार गटाला द्यावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. 'घड्याळ' हे चिन्ह गेल्या ३० वर्षांपासून शरद पवार यांच्याशी जोडले गेले आहे. अजित पवार यांनी निवडणुकीत या चिन्हाचा वापर केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

Powered By Sangraha 9.0