‘ऑक्सफर्ड युनियन’च्या मंचावर मुज्जमिलने ओकली गरळ

13 Nov 2024 16:05:20
Mujjamil

नवी दिल्ली : ‘ऑक्सफर्ड युनियन’ने ( Oxford union ) भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन केले आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी ‘काश्मीरचे स्वातंत्र्य’ या वादग्रस्त विषयावर मतप्रदर्शन करण्यासाठी पाकिस्तानचे मुज्जमिल अय्युब ठाकूर यांना आमंत्रण दिले आहे.

‘ऑक्सफर्ड युनियन’ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्था असून ज्यामध्ये राजकारण, शैक्षणिक आणि विविध संस्कृतीवर कार्य करणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख व्यक्तींना त्यांचे विचार मांडण्याची संधी देत असते. या संस्थेने दि. १४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे मुज्जमिल अय्युब ठाकूर यांना आमंत्रण दिले आहे. ठाकूर दीर्घकाळ काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वादग्रस्त वक्तव्य करत असून ‘ऑक्सफर्ड युनियन’ने त्यांना आमंत्रित करणे हे आश्चर्यकारक आहे.

“काश्मीर हा भाग भारताचा अंतर्गत भाग असून हा भाग प्रदीर्घकाळ दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये घुसमटला आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम काश्मिरी जनतेच्या सर्वांगीण विकासावर होत आहे,” असे वक्तव्य मुज्जमिल अय्युब ठाकूर यांनी केले होते. त्याचीच री ओढत काश्मीरच्या स्वायत्तता आणि सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची गरज नव्याने निर्माण झाल्याचे ‘ऑक्सफर्ड युनियन’ने त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी संदेशात म्हटले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने त्यावर अनधिकृतरित्या कब्जा केला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मुक्त होण्यासाठी भारताकडून सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत असतो. मुज्जमिल हा लंडनस्थित आयएसआय एजंट अय्युब ठाकूरचा मुलगा असून अय्युब ठाकूरने ‘द जस्टीस फाऊंडेशन’ आणि ‘वर्ल्ड काश्मीर फ्रीडम मूव्हमेंट’ या दोन्ही संस्थांची स्थापना केली होती, जी आता मुज्जमिल चालवत आहे. २०१५ साली एका युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुज्जमिलने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये असलेल्या आयुब ठाकूरच्या योगदानाचे समर्थन केले होते. मुज्जमिलने संयुक्त राष्ट्रसंघासहित अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या काश्मीर भूमिकेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता.

Powered By Sangraha 9.0