विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, ‘महावतार’मधील थक्क करणारा लूक प्रदर्शित

13 Nov 2024 13:16:37
 
vicky kaushal
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच अभिनेत्याचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे तो म्हणजे विकी कौशल. लवकरच त्याचा ‘छावा’ हा चित्रपट येणार होता मात्र ‘पुष्पा २’ या चित्रपटाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, यादरम्यानच नुकत्याच त्याच्या आगामी ‘महावतार’ या चित्रपटातील थक्क करणारा लूक समोर आला आहे. सात चिरंजीवींमधील एक परशुराम यांच्यावर आधारित या चित्रपटात विकी कौशल भगवान परशुराम यांची भूमिका साकारणा आहे. 'छावा'चे निर्माते दिनेश विजान यांच्याच मॅडॉक फिल्म्सने 'महावतार'ची निर्मिती केली आहे.
 
शस्त्र, शास्त्रात पारंगत, अधर्मीयांचा नाश, निसर्ग संवर्धनाला हातभार, स्त्रीसबलीकरणाला प्रोत्साहन, वैदिक धर्माचा प्रसार आणि मातृ पितृ भक्ती अशी ख्याती असलेले भगवान परशुराम. लांब दाढी, वर बांधलेले केस, भगवे कपडे, हातात परशु, डोळ्यात आग असा विकीचा अंगावर काटा आणणारा लूक समोर आला आहे. मॅडॉक फिल्म्स आणि विकी कौशलने सोशल मीडियावर फर्स्ट लूक शेअर केला आहे. धर्माचं रक्षण करणारा योद्धा चिरंजीवी परशुराम यांची कहाणी असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
 
vicky kaushal 
 
'महावतार' मधील विकी कौशलचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 'फक्त विकीच या भूमिकेला न्याय देऊ शकतो' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्याने केली आहे. 'महावतार' चित्रपट डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून अमर कौशिक यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
 
Powered By Sangraha 9.0