सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न; न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट

13 Nov 2024 15:40:30

sachin waze 
 
मुंबई : सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असा खुलासा निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला होता. परंतू, या आयोगाचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
 
यासंबंधी बोलताना न्यायमूर्ती चांदीवाल म्हणाले की, "२७ एप्रिल २०२२ रोजी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे माझा अहवाल सोपवला होता. त्यात ज्या बाबी मांडल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे तो अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. माझ्या या कालावधीत शासकीय अधिकाऱ्यांनी मला पाहिजे तशी मदत केली नाही. परमबीर सिंग यांना आयोगासमोर आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. सीआयडीसारख्या विभागाने ते आढळून येत नाही असा वारंवार रिपोर्ट दिला. त्यामुळे यातच काहीतरी पाणी मुरत असल्याचे ध्यानात आले. आयोगाच्या कामाकरिता स्वतंत्र जागा, स्टाफ, गाडी यातील काहीच दिले गेले नाही. मी माझी नाराजी मांडली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटीमध्ये या बाबी सांगितल्या."
 
हे वाचलंत का? -  राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
 
"याप्रकरणी पुरेशे साक्षी पुरावे दिले गेले नाहीत. सचिन वाझेंनी दिलेल्या शपथपत्राला अनुसरून साक्षी पुरावे दिले असे तर आज बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा असत्या. त्यांनी त्यांच्या शपथपत्रात दोन राजकीय व्यक्तींचे नाव घेतले होते. त्यांच्या आर्थिक व्यवहाराचाही उल्लेख केला होता. तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार अशी त्यांची नावे आहेत. त्यानंतर मी हे माझ्या रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझेंना सांगितले. सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते सुद्धा मी रेकॉर्डवर घेतले नाही. मोठी नावे घेतली की, प्रसिद्धी मिळते, चर्चा करण्यासाठी खाद्य मिळते. पण मला ते होऊ द्यायचे नव्हते. ज्या उद्देशाने आयोगाची स्थापना झाली तो उद्देश वेगळा होता. परंतू, इतर व्यक्तींना गुंतवून स्वत:ची प्रसिद्धी करणे मला मान्य नव्हते," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "सचिन वाझेंनी प्रतिज्ञापत्रात ज्या राजकीय व्यक्तीबाबत लिहिले होते ते मी साक्षी पुराव्यांमध्ये घेणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष पोलिस अधिकारी आहे. ते योग्य मार्गावर असते तर फार पुढे गेले असते. या प्रकरणात ठाण्याचे एक डीसीपी हस्तक्षेप करत होते. तसेच परमबीर सिंग आणि सचिन वाझेंची बैठकही उघड झाली होती. सचिन वाझे आणि अनिल देशमुखांचीही एक स्वतंत्र बैठक झाल्याचे मी ऐकले. अनिल देशमुख म्हणत असले तरी मी क्लिनचिट असा कुठलाही शब्दप्रयोग माझ्या अहवालात नाही. साक्षीपुरावा आला नाही, असे मी म्हटले. याचा अर्थ क्लिनचिट दिली असा होत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0