मुंबई : “हिंदुत्वाच्या गाभ्यातच विश्व कल्याण समाविष्ट आहे. आज जो काही विकास झाला, तो अपूर्णच राहिला आहे. किंबहुना, धर्म आणि राजकारणाच्या बाबतीतही धर्म आणि राजकारण या संकल्पनेला व्यवसाय बनवले गेले. संपूर्ण जग नास्तिक आणि आस्तिक अशा दोन विचारधारांमध्ये विभागले गेले. पुढे ते संघर्षाचा विषयही बनले. संसाधने अमर्यादित झाली, पण मार्ग सापडला नाही. त्यामुळे जग भारताकडे आध्यात्मिक शांतीच्या आशेने पाहात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Mohanji Bhagwat ) यांनी केले.
‘योगमणी ट्रस्ट जबलपूर’ आयोजित योगमणी वंदनीय डॉ. उर्मिला जमादार यांच्या स्मृतिदिनानिमित्त नुकत्यात जबलपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी हिंदुत्वाच्या समर्पकतेवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी “संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, “आज जगाची स्थिती पाहाता, साधनसंपन्न आणि अमर्याद ज्ञान अशा स्वरुपाची ती आहे. पण त्याच्याकडे मानवतेच्या कल्याणाचा मार्ग नाही. भारत या बाबतीत समृद्ध आहे. पण सध्याच्या संदर्भात भारताला आपल्या ज्ञानाचा विसर पडला आहे. भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानात अविद्या आणि विद्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात संतुलन राखण्यासाठी दोघांमधील परस्पर संबंध आवश्यक आहे. हिंदू धर्मात हे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू धर्म अविद्या आणि विद्या या दोन्ही मार्गांनी चालतो. म्हणूनच तो अतिरेकी किंवा धर्मांध नाही. तर पाश्चिमात्य संकल्पना अतिरेकी आणि कट्टरता दर्शवते. कारण, त्यांना त्यांचे हितसंबंध नष्ट होण्याची भीती असते. या कारणास्तव त्याची दृष्टी अपूर्ण आहे.