मुंबई : “मविआच्या लबाड सरकारने धानाला बोनस जाहीर केला. मात्र, जाहीर केलेला बोनस कधीच दिला नाही. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही १५ हजार दिले. त्यापुढील वर्षी २० हजार रुपये बोनस दिला. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर धानासाठी २५ हजार रुपये बोनस देणार आहोत. तसेच, शेतकर्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी केला.
आमगाव-देवरी येथील भाजपचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी देवरी (गोंदिया) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी, मध्य प्रदेशचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, आ. परिणय फुके आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “पुन्हा एकदा आमगाव-देवरी मतदारसंघामध्ये संजय पुराम यांच्याकरता आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, तेव्हा या भागाचा सातत्याने विकास आपल्या सरकारने केला. आमदार नसतानाही संजय पुराम यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक कामे आपल्या सरकारकडून मंजूर करुन घेतली.
आदिवासी समाजाकरिता ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ आपल्या सरकारने हाती घेतली. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा, वस्त्यांचा समग्र विकास होत आहे. महायुती सरकारने महिला, युवा वर्ग आणि विविध समाजघटकांच्या कल्याणाकरिता आणलेल्या योजनांची माहिती फडणवीस यांनी दिली.
जनतेची साथ, महाविजयाचा विश्वास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवित असलेल्या ‘दक्षिण-पश्चिम नागपूर’ मतदारसंघात सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दुसर्या टप्प्यातील भव्य प्रचाररॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “समाजाला जातीजातींत विभाजित करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे आणि म्हणूनच ’एक हैं तो सेफ हैं’ असा नारा आम्ही दिला. दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये जनतेचे भाजप-महायुती सरकारवर असणारे प्रेम, विश्वास आणि पाठबळ प्रत्येक ठिकाणी दिसून आले. हे प्रेम आणि विश्वासच महायुतीच्या महाविजयाची हमी देत आहे, असेही त्यांनी सांगितले.