लातूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोग कर्मचारी आपली भूमिका बजावत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाने याआधीही तपासली होती. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मतदारसंघात ते गेले असता त्यांनी चांगला संताप व्यक्त केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाला आपले काम करण्यापासून त्यांनी विरोध केला. त्यांची पुन्हा एकदा बॅग तपासण्यात आल्याने त्यांचा पारा चढला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उद्धव ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थी गेले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तापासली. त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत निवडणूक आयोगाने कोणाची बॅग तपासली आहे? असा सवाल निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना केला आहे. दरवेळी पहिला गिऱ्हाईक मीच सापडतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांचा व्हिडिओ आता एका कर्मचाऱ्याने चित्रित केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना सुनावले असून सुरक्षारक्षकांनी आपली भूमिका बजावली असल्याचे दिसून आले.