रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार विविध कलांचा जागर

12 Nov 2024 18:22:50

rambhau mhalgi prabodhini
 
नायगाव : प्रशिक्षण आणि व्यक्तिविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने एक अभिरुची जोपासना कार्यशाळा’ आयोजित केली आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत म्हाळगी प्रबोधिनीच्या केशवसृष्टी, उत्तन येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात ही कार्यशाळा होणार आहे. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांचा जागर या निमित्ताने होणार आहे. या कार्यशाळेत मैत्री पुस्तकांशी, शास्त्रीय संगीताचा कान तयार करणे, चित्रपट संगीताचा आनंद, चित्रपट पाहण्याची दृष्टी, नाटक समजून घेताना, रसिक नजरेतून चित्रकला, शिल्पकला : निर्जीवातील जिवंतपणा - या विषयांवर अनुक्रमे सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. अभिराम भडकमकर, संगीत अभ्यासक श्री. केशव परांजपे, चित्रपट संगीताच्या दर्दी जाणकार डॉ. मृदुला दाढे, दिग्दर्शक व सिनेअभ्यासक श्री. अशोक राणे, रंगभूमीचे उपासक व अनुभवी नाट्यप्रशिक्षक श्री. वामन केंद्रे, प्रतिभावान लेखक व चित्रकार श्री. विजयराज बोधनकर आणि सुप्रसिद्ध व प्रयोगशील शिल्पकार श्री. भगवान रामपुरे हे दिग्गज मान्यवर सहभागींशी संवाद साधणार आहेत. पाककलेला एका वेगळ्या उंचीवर नेणारे विश्वविख्यात रसज्ञ आणि पाककलाकार (शेफ) श्री. विष्णू मनोहर यांच्या विशेष उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. याचबरोबर अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीच्या अभिवाचनाचा विशेष प्रयोगही होणार आहे.
 
या कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपले जगणे अधिक समृद्ध करण्यासाठी, या कार्यशाळेत अधिकाधिक जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी केले आहे. आपल्या कलाविषयक जाणिवा आणि संवेदना अधिक समृद्ध करणाऱ्या या कार्यशाळेत कलांची आवड असणारे १८ वर्षाच्या वरील कोणीही सहभागी होऊ शकतात.
 
अधिक तपशिलासाठी विनय वसंत मावळणकर, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी (९०९६५४८२५०), अनिल पांचाळ, साहा. कार्यक्रम अधिकारी (९९७५४१५९२२) यांच्याशी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0