चंद्रपूर : ( Shivani Wadettiwar ) राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या ९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने खेड्यापाड्यांपासून शहरांमधील गल्लीबोळापर्यंत प्रचारसभांचा धुरळा उडताना दिसत आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार सध्या चर्चेत आल्या आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान शिवानी यांनी शिवराळ भाषा वापरत वीज कर्मचाऱ्यांना थेट धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवानी वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी मतदारसंघातील एका गावात प्रचारसभा सुरू असताना लाईट गेल्याने मोबाईलच्या टॉर्चवर सभा घेत भाजपवर टीका करत महावितरणला शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी शिवीगाळ केल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.
काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?
"विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमचे जीवन अंधार पेरण्याचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. XXXरात्रभर वीज घालवूनही यांना ८००-१००० रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. या लोकांची आम्ही फजिती करू. भाजप सरकारच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका. विजू भाऊंना बहुमताने निवडून द्यायचंय. पहिल्यांदा झालेल्या आमदाराला शिकायला दहा वर्षे जातील. ते विरोधी पक्ष नेते आहेत, ते उद्याचे मुख्यमंत्री आहेत", असं म्हणत शिवानी यांनी वडेट्टीवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.