मराठीमधील पहिले भावकवी, आत्मचरित्रकार, चरित्रकार, वारकरी संप्रदायाचे प्रभावी प्रचारक आणि वारकरी कीर्तन पद्धतीचे जनक अशा विविध पैलूंचे ‘आद्यत्व’ संत नामदेवरायांच्या नावावर आहे. जोडीलाच ‘नामदेवराय’ हे हिंदी भक्तिकाव्याचे, हिंदी साहित्यसृष्टीचेदेखील आद्य जनक आहेत. (प्रा. नि. ना. रेळेकर, 1124) ‘खडी बोली’त (सधूक्कडीत) रचना करणारे ते ‘आद्य अ-हिंदी’ कवी आहेत. याशिवाय तत्कालीन भारतीय स्थितीगतीचा आढावा घेऊन तिचे वास्तव चित्रण करणार्या नामदेवरायांना ‘आद्य भारतीय इतिहासकार’ असेही म्हणता येईल. अशा या सामाजिक समरसतेचे मापदंड ठरलेल्या संत नामदेव महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या संतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
धुर भावकविता लिहिणारे संत नामदेवराय एका अर्थाने प्रयोगशील कवीदेखील आहेत. ते ज्या ज्या प्रदेशात गेले, तेथील भाषा त्यांनी आत्मसात केली आणि तिला मराठीच्या वळणामध्ये बसविण्याचे प्रयोग केले याची साक्ष देणारे त्यांचे अभंग उपलब्ध आहेत.
जोडीलाच त्यांच्यामधील ‘कर्ता समाजसुधारक’ देखील तितकाच प्रभावी आहे. समतेच्या समरसभावात तथाकथित पददलितांना, स्त्रियांना सन्मानाने सामावून घेऊन त्यांचे आत्मसामर्थ्य जागवित संत नामदेवरायांनी सामाजिक समरसता भाव अधिक व्यापक केला.म्हणूनच संत चोखोबारायांची भक्ती, त्यांची वेदना आणि विठ्ठलमंदिराच्या पायरीसमोर तरी अखेरची विश्रांती मिळावी, ही त्यांची उत्कट इच्छा नामदेवरायांनी केवळ समजून घेतली नाही, तर ती पूर्णदेखील केली. केवळ संत चोखोबांनाच नव्हे, तर त्यांच्या विठ्ठलभक्त कुटुंबाला मानसिक आधार देत त्यांच्यातील आत्मसामर्थ्य जागृत करीत त्यांना ’बोलते’ करण्याचे कार्य संत नामदेवांनी केले.
समाजाच्या निकोप विकासासाठी तळागाळातील बांधवांचे आत्मसामर्थ्य जागविणे आणि स्त्रियांना सन्मानाने वागणूक देणे आवश्यक असते, याचे भान असणार्या आणि त्याप्रमाणे वागणार्या ‘वीरशैव’ संप्रदायाशी गुरुपरंपरेने निगडित झालेले नामदेवराय. भारतीय संतचळवळीला मातृभावनेचे वळण लावणारे नामदेवराय भोळे-भाबडे मात्र नव्हते. एक सावध, ठाम सामाजिक भूमिका त्यांच्या विचार कृतींमध्ये आढळते. सामाजिक, आर्थिक विषमतेची जाण त्यांनी वेळोवेळी नेमकेपणाने व्यक्त केली आहे. त्याविरुद्ध आवाजही उठवला आहे.
वर्णविषमता, जातीभेद यामुळे माणसाने माणसाला कमी लेखणे, टोकाचे कर्मकांड आणि अनेक देवतोपासना यामुळे कुंठित झालेला व्यक्तिविकास आणि पर्यायाने साकाळलेले समाजजीवन, अशी परिस्थिती अवतीभवती असताना गीताभाष्याच्या रूपाने ज्ञानदेवांनी ’चिद्विलासवादाचे’ तत्त्वज्ञान मांडीत समाजात ’आत्मौपम्य’वृत्ती (सहानुभवाची, सहसमवेदनेची भावना) रुजविण्याचा प्रयत्न केला. स्वतः ज्ञानदेवांनी हिंदू धर्मातील कर्मकांडग्रस्त समाजाचा आणि तथाकथित धर्ममार्तंडांच्या रोषाचा, संवेदनाशून्यतेचा दाहक अनुभव घेतला होता आणि तरीही त्या ’विश्वात्मक देवा’कडे त्यांनी खळांची व्यंकटी सांडावी, बलवंतांनी सत्कर्माकडे वळावे, आणि सदाचारसंपन्न अशा ईश्वरनिष्ठांचे संघटन व्हावे असे ’पसायदान’ ईश्वराकडे मागितले. या पसायदानात ’पंढरीरायाचे प्रेमभंडारी’ संत नामदेवांच्या अभंगवाणीचा आणि विविध जातीजमातींमधील सुहृदांच्या अंतरीच्या बोलांचा स्वर एकरूप झाला.
जातिपातींपलीकडे जाऊन माणसाचा शोध घेणार्या व्यापक वृत्तीच्या नाथ संप्रदायाशी निगडित असलेली गुरुपरंपरा, अलौकिक प्रतिभा, देवदुर्लभ बुद्धिमत्ता आणि सिद्धयोगी पूर्वसुकृताचे देणे लाभूनही एकांतात न रमता ज्ञानदेवांनी ’लोकसंस्था रक्षणीय सर्वथा’ हा प्रबोधनभाव सतत मनाशी बाळगत त्याप्रमाणे कार्य केले. पूर्वपरंपरेचे मंथन करीत संभ्रमित समाजाला एकत्र करणार्या धर्मविचारांचे चिंतन मांडले. त्यामुळेच ’चोखा जीवा बरोबरी असलेल्या लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या परिवारात पुढे चाले ज्ञानेश्वर’ अशी स्थिती निर्माण झाली. ज्ञानदेवांचे हे पुढे चालणे केवळ क्रियादर्शक नसून समरसतेच्या वाटचालीत त्यांनी घेतलेला अग्रक्रमही सूचित करणारे ठरले.
सामाजिक समरसता भाव समाजामध्ये रुजविणे हे एकट्या दुकट्याचे काम नसते. येथे सज्जनांचे मार्गदर्शन, क्रियाशीलांची साथसंगत आणि समविचारी स्नेही जनांचे संघटन महत्त्वाचे असते. याचे भान असलेल्या संत नामदेवरायांनी या जातीभेदामुळे विस्कळीत झालेल्या समाजाचे संघटन संत ज्ञानदेवांच्या मदतीने केले. चोखोबारायांसारखी अनेक ईश्वरभक्त कुटुंबे आपल्या स्नेहभावामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सुदूर वायव्य भारतापर्यंत जोडली. संत ज्ञानदेव आणि नामदेवरायांचे ऋजू व्यक्तिमत्त्व, प्रभावी संघटनवृत्ती, कर्मकांड विरहित विठ्ठलभक्ती तसेच, सामाजिक समरसभावात तथाकथित पददलितांना समजून घेत आणि त्यांचे आत्मसामर्थ्य जागवीत त्यांना बोलते करण्याचे कार्य यामुळे महाराष्ट्रात ‘भक्ती आंदोलना’ला गती मिळाली.
आजच्या कुटुंबविघटनाच्या काळात संत नामदेवरायांमधील जागृत कुटुंबप्रमुखदेखील नोंद घ्यावा असाच आहे. स्त्रियांना कस्पटासमान लेखणार्या त्या काळात आपल्या कुटुंबातील स्त्रियांना लिहिण्यासाठी उद्युक्त करीत नामदेवरायांनी आपल्या गाथेत गोंदा, विठा, महादा या मुलांबरोबरच गोणाई, राजाई, लाडाई, निंबाई आणि जनाई यांच्या रचनांना सामावून घेतले. त्यांच्या या कुटुंबवत्सल, परिवर्तनवादी वृत्तीमुळेच त्यांची गाथा केवळ ’नामदेव गाथा’ न राहता ती ’नामदेव परिवार गाथा’ बनली आहे.
भारतीय संतचळवळीला ’मातृभावनेचे’ वळण लावणारे ’आद्य मराठी तत्त्वज्ञ’ म्हणून त्यांना वंदन करायला हवे. हा मातृभावच त्यांच्या सामाजिक समरसता कार्याचा पाया आहे. या मातृभावाचे परिणत रूप नामदेव-जनाईच्या नात्यामधून निखळपणे जाणवते. आपल्या वडिलांनी ’दामाशेट्टीं’नी सांभाळलेल्या पोरक्या जनाईला त्यांनी कधी ’विठ्ठल’रूपात, कधी ’धाकटा भाऊ’ म्हणून मानसिक आधार दिला. जनाईंची एकनिष्ठ विठ्ठलभक्ती ओळखून ’सद्गुरू’ रूपाने त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या जीवनानुभवाला, आध्यात्मिक अनुभवांना अभिव्यक्त करावे यासाठी प्रेरणा दिली. म्हणूनच एरवी पोरक्या ठरणार्या जनाई ’स्त्रीजन्म म्हणवूनि न व्हावे उदास’ असा आत्मविश्वास प्रकट करीत, ’बाई मी लिहिणे शिकले सद्गुरूपाशी’ अशी कृतज्ञताही व्यक्त करतात. आपण नामदेवांची दासी (शिष्य) असल्याचे अभिमानाने सांगतात.
समाजाला सदाचाराचा पाया लाभावा म्हणून नामदेवरायांनी समाजाला दिशा देणार्या सद्गुणांचे प्रतीक असणार्या कथानायकांच्या चरित्र-चारित्र्याचा जागर आपल्या कीर्तनांमधून जाणीवपूर्वक केला. त्यामध्ये वैराग्याचे प्रतीक असणारे शुक मुनी आहेत. ’प्राण जाए पर वचन न जाए’ मानणारा राजा हरिश्चंद्र आहे. भक्तिक्षेत्रात मानसिक दृढतेचे महत्त्व सांगणारे चांगुणा-श्रीयाळ आहे किंवा माणसांमधील ध्येयवेडी वृत्ती जपणारा ’ध्रुव’, प्रतिकूलतेतही सदाचाराने वागत एकनिष्ठ भक्तीत करणारे सुदामा, प्रल्हाद, उपमन्यू हे आणि असे अनेक भारतीय श्रद्धापुत्र नामदेवरायांनी आपल्या आख्यानकाव्यातून सजीव केले. त्यामागे केवळ आपल्या कीर्तनाचा उत्तररंग प्रभावी करणे एवढाच मर्यादित हेतू नाही.
स्वत्व, स्वाभिमान, संस्कृती, सुजाणता यावर पाशवी आक्रमण करणार्या इस्लामी राजवटीत ताठ मानेने, निर्भय मनाने जगायला शिकायचे असेल, तर भांबावलेल्या तत्कालीन समाजाला एक निर्णायक आधारस्तंभ देणे आवश्यक होते. वैयक्तिक नामसाधनेला व्यापक समाजरूप देऊन लोकसंघटन करण्याचे आव्हान समोर होते. ते आव्हान अशा आख्यानकथांमधून तसेच दशावतार वर्णन, समकालीन संतांची चरित्रे यामधून नामदेवराय समर्थपणे पेलताना दिसतात. आक्रमकांच्या दहशतीपासून जनमनाला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. विझलेल्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यासाठी अभंगांची रचना करतात.
इ. स. 1270 ते इ. स. 1350 असे 80 वर्षांचे दीर्घायुष्य नामदेवरायांनी आपल्या काव्यकर्तृत्वाने आणि संघटक वृत्तीने समृद्ध केले. मूळची मृदूमवाळ, संवेदनशील वृत्ती, जागृत आत्मभान आणि सभोवतालच्या परिस्थितीची जाण याच्या जोडीलाच सद्गुरुकृपा आणि ज्ञानदेवांची निखळ मैत्री यामुळे संत नामदेवांचे जीवनकार्य काळपटावर अजरामर ठरले.
अंदाधुंदीच्या राजवटीत आणि प्रवास-सुविधांचा अभाव असणार्या त्या काळात, वयाच्या 54व्या वर्षांनंतर नामदेवरायांनी एकट्याने भारतभ्रमण केले. जिवलग विठ्ठलाला सोडून जवळपास 20 वर्षे त्यांनी वायव्य भारतामध्ये (पंजाबात) वास्तव्य करीत भक्तीच्या द्वारा संतसज्जनांचे अपूर्व संघटन केले.
संत नामदेवरायांच्या भक्तियात्रेचा, त्यांच्या काव्यकर्तृत्वाचा आणि स्नेहशील व्यक्तित्त्वाचा प्रभाव पश्चिम, वायव्य आणि उत्तर भारतातील समकालीन आणि उत्तरकालीन संतांवर विशेषत्वाने दिसतो. त्यामुळेच उत्तरेतील स्वामी रामानंद, संत कबीरदास, संत रोहिदास, संत त्रिलोचन, संत धन्नाजाट यांच्याप्रमाणेच पंजाबमधील संत नानक देव, गुर्जर संत नरसी मेहता, राजस्थानच्या संत मीराबाई, आसामचे संत शंकरदेव असे सारेच संत-सत्पुरुष नामदेवरायांना आपल्या सद्गुरूंचे, परमगुरूंचे स्थान बहाल करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत भक्तीच्या माध्यमातून स्त्रैण, क्रूर अशा इस्लामी राजवटीविरुद्ध उभे राहत, हिंदुत्वाचा जागर करतात. म्हणूनच संत नामदेवराय हे उत्तर भारतीय वैष्णवांचे कुलपुरुष, लोकविद्यापीठाचे अनभिषिक्त कुलगुरू ठरतात. ’भक्त-भारती’चे मानदंड बनतात.
श्रीविठ्ठल हा नामदेवांचा जीव की प्राण आहे. परंतु, त्याच्या ठायी नामदेवरायांची दृढ परंतु, डोळस भक्ती आहे. ‘सत्य लोपलें धर्म बुडाला । काय पाहतोसि उगला । धावें विठ्ठला।’ अशी साद ते वठ्ठलाला घालतात. मात्र, त्याच्या मदतीची अपेक्षा न करता, विस्कळीत झालेल्या समाजाचे संघटन करण्यासाठी, तीर्थाटन करतात. साहित्यनिर्मिती करतात. तीर्थाटनाच्या निमित्ताने देश-काळ परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करीत, ‘आले आले रे हरिचे डिंगर। वीर वारीकर पंढरीचे।’ (ना. गा. 833/34) अशा शिस्तबद्ध वारीकर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार करतात. त्यातून जनसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कीर्तनासारख्या लोकप्रबोधनपर माध्यमाचा वापर करतात .
कसोटी पाहणार्या त्या काळात ’देह आणि देव’ यांना तारण्याचा तसेच प्रतिकूलतेतही धर्मश्रद्धा अखंड राखण्याचा नामदेवरायांचा हा प्रयत्न त्यांच्यामध्ये कुशल व समर्थ संघटकाचे दर्शन घडविणारा आहे. समाजाला ’उभे’ करण्यासाठी, लोकांच्या भाषेत बोलणारा, त्यांच्यात मिसळून मनःपरिवर्तन करणारा, प्रसंगी प्राणांची बाजी लावणारा, वीर वृत्तीचा कुशल संघटक म्हणजे संत नामदेवराय असे अभिमानाने नोंदवावे लागते.
संघटकाचे एक प्रभावी अस्त्र म्हणजे त्याचे लाघवी, हृदयस्पर्शी बोलणे. नामदेवांच्या संदर्भात- ‘भक्त भागवत बहुसाल ऐकिले। बहु होऊनी गेले, होती पुढे॥ परि नामयाचे बोलणें नव्हे हें कवित्व। हा रस अद्भुत निरूपमु॥ हे सुख विश्रांती नाही हो कल्पांती। विचारावे संती दूरदृष्टी॥ हे खुण जाणता एक पंढरीरावो। रूखमादेवी नोहो श्रीविठ्ठल॥ (ज्ञानदेव अ.क्र. 918)’ अशा शब्दांत प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी नामदेवरायांच्या वक्तृत्वाचे, रससंपन्न वाणीचे कौतुक केलेले आहे. ’सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ आणि अनुभवसंपन्न, आचारप्रवण तो प्रभावी वक्ता असल्याशिवाय शाश्वत समाजपरिवर्तन होत नाही, याची जाणीवच जणू द्रष्टे ज्ञानदेव या ओळीतून प्रगट करतात.
हे संत नामदेवराय मूळातच आत्मसामर्थ्यसंपन्न, परिवर्तनाची आस बाळगणारे आणि त्यासाठी सर्वस्वाची बाजी लावणार्या मनोवृत्तीचे आहेत. मात्र, सद्गुरूंच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला एक अनोखे वळण लाभले. ती भेट भारतीय भक्तिआंदोलनाला विधायक वळण लावणारी ऐतिहासिक घटना ठरली. त्यानंतर इ. स. 1297 ते इ. स. 1304 या सहा वर्षांत इस्लामी आक्रमणाने त्रस्त झालेल्या प्रदेशांमधून नामदेवरायांनी पायी प्रवास केला. पश्चिमेकडून पदयात्रेला सुरूवात करून केदार, कैलास, बद्रिनारायण, मानसरोवरापर्यंतचा प्रदेश त्यांनी पिंजून काढला. हिंदीमधून आणि प्रादेशिक भाषांमधून त्यांनी पुन्हा पुन्हा- ‘एकै पाथर कीजै थाऊ। दूजे पाथर धरिए पाऊ॥ जै इहु देऊ तहु भी देवा। कहि नामदेऊ हम हरिकी सेवा॥ (ना.गा. 2258)’
हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातून सर्वसामान्यांच्या मनात ईश्वरी तत्त्वावरील विश्वास दृढ झाला. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उत्तर, पश्चिम, वायव्य भारतात उभी राहिली. या प्रवासाची परिणतीदेखील म्हणजे त्यातूनच ’स्वराष्ट्र’ निर्मितीची प्रेरणा जागृत झाली. विठ्ठलावरील दृढ विश्वास संतसज्जनांचे संघटन याचे प्रारूप स्वधर्म, स्वराष्ट्र निर्माण करणार्या शूर, निर्भय सिख्ख गुरूपरंपरेच्या रूपाने पंजाबात आणि हिंदवी स्वराज्याच्या रूपाने महाराष्ट्रात साकार झाल्याचे दिसते. भक्तीच्या माध्यमातून राष्ट्राला मजबूत करणार्या संत नामदेवरायांच्या 754व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना शतशः प्रणाम.
डॉ. श्यामा घोणसे
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख आहेत.)