पक्ष्यांच्या जीविताचा संघर्ष

    11-Nov-2024   
Total Views |
nyc bird alliance report
 

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थलांतरादरम्यान होणार्‍या पक्ष्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. शरद ऋतुतील स्थलांतराचा हंगाम सुरू होत असताना पक्षीप्रेमींनी या घटनांबद्दल नुकतीच चिंता व्यक्त केली. न्यूयॉर्कमधील ‘NYC बर्ड अलायन्स’च्या अहवालानुसार, शहरातील इमारतींना धडकून मृत्युमुखी पडणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत पक्ष्यांच्या अशाप्रकारच्या अपघातांमध्ये 20 टक्के वाढ झाल्याचे दिसते, तरी अद्याप अंतिम आकडेवारी उपलब्ध नाही.

न्यूयॉर्कमधील पक्ष्यांसाठी शरद ऋतूमधील स्थलांतर हा विशेषकरुन धोकादायक कालावधी मानला जातो. वसंत ऋतूपेक्षा शरद ऋतूमध्ये स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांची संख्या जास्त असते. कारण, या कालावधीत परतणारे प्रौढ पक्षी आणि पहिल्यांदाच नव्याने स्थलांतर करणारे लहान पक्षीदेखील असतात. उत्तरेकडील शीत हवामान सोडून हेे पक्षी उबदार दक्षिणेकडील हवामानाकडे परत जात असताना, ‘अटलांटिक फ्लायवे’वर न्यूयॉर्कसारख्या शहरांमधून जातात. या काळात स्थलांतरात नवखे असलेले लहान पक्षी अपघातांना बळी पडतात. कारण, त्यांच्या वाटेत टोलेजंग, काचेच्या परावर्तित इमारतींचे आव्हान उभे ठाकलेले असते.

गगनचुंबी इमारतींवरील काचेच्या पृष्ठभागामुळे आणि रात्रीच्या कृत्रिम प्रकाशामुळे या इमारती पक्ष्यांसाठी सर्वस्वी धोकादायक ठरतात. अनेक स्थलांतरित पक्षी, विशेषत: ‘सॉन्गबर्ड्स’ रात्री प्रवास करतात. दिशादिग्दर्शनासाठी तार्‍यांसारख्या नैसर्गिक प्रकाशावर हे पक्षी अवलंबून असतात. मात्र, शहरांतील झगमगाटामुळे हे पक्षी पुरते गोंधळतात आणि हे पक्षी पूर्ण वेगाने काचांवर आदळतात. जमिनीवर पडल्यामुळे हे जखमी पक्षी दुर्लक्षित राहून त्यांचे अस्तित्व धोक्यात येते.
 
पक्षीप्रेमी आणि स्वयंसेवक दररोज सकाळी पदपथांवरून असे कित्येक जखमी किंवा मृत पक्षी गोळा करतात. हे पक्षी नंतर ‘वाइल्ड बर्ड फंड’ या संस्थेकडे उपचारार्थ पाठवले जातात. या हंगामात या संस्थेत दररोज 60 ते 70 जखमी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे, जी संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे. ’BirdCast’ नावाचा उपक्रम हवामान रडारचा वापर करून पक्ष्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेतो. त्यानुसार यंदाच्या शरद ऋतूमध्ये मॅनहॅटनच्या आकाशातून 9.7 दशलक्ष पक्ष्यांचे स्थलांतर झाले. 2023 साली हा आकडा 9.5 दशलक्ष होता. तसेच या हंगामातील आकडेवारीतील वाढीमुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील काही शहरांनी पक्ष्यांच्या हे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली आहेत. काही इमारतींनी स्थलांतर हंगामात रात्रीचे दिवे स्वेच्छेने बंद ठेवणे सुरू केले आहे. तसेच, काहींनी पक्ष्यांसाठी सुरक्षित काचेचा वापर केला आहे, ज्यामुळे पक्ष्यांना प्रतिबिंब गोंधळात टाकत नाही. अशा काचा पक्ष्यांना अधिक दृश्यमानता प्रदान करतात, ज्यामुळे हे पक्षी मोकळ्या आकाशाच्या प्रतिमेसाठी चुकीच्या प्रतिबिंबाकडे आकर्षित होत नाहीत. अमेरिकेतील पक्षीसंवर्धन गटांचा असा अंदाज आहे की, दरवर्षी एक अब्जांहून अधिक पक्षी काचांवर आदळून होणार्‍या अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात आणि न्यूयॉर्क शहरातील घनदाट इमारती यातील अनेक मृत्यूस जबाबदार आहेत.

‘NYC बर्ड अलायन्स’ नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून इमारतींच्या रचनांमध्ये बदल सुचवतो. साध्या उपायांमुळे पक्ष्यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय घट करता येते. सध्या न्यूयॉर्कमध्ये या समस्येवर कायदे प्रलंबित आहेत. कृत्रिम प्रकाश कमी करण्याबरोबरच, नवीन इमारतींमध्ये पक्षी-सुरक्षित काचेच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि विद्यमान इमारतींमध्येही पक्षी-अनुकूल पुनर्रचना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शहरी विकास आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये संतुलन साधण्यासाठी यापुढे शहरी नियोजनामध्ये पक्ष्यांसाठी सुरक्षित रचना आणि टक्कर टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरांनी पक्ष्यांसाठी सुसंवादी उपाययोजना करून या पक्ष्यांच्या नैसर्गिक स्थलांतरात सहकार्य करावे. सद्यःस्थितीत, पक्षीप्रेमी पक्ष्यांच्या अपघातांचे निरीक्षण करून आवश्यक उपचार करतात. परंतु, अधिक प्रभावी संरक्षणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत.
 


उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.