‘इतिहास’ म्हणजे आपल्या पूर्वजांचा खरा पुरुषार्थ!

11 Nov 2024 15:13:45
Dr. Pandey

मुंबई : “हिस्ट्री आणि इतिहास या दोन्ही शब्दांत मोठे अंतर आहे. ‘हिस्ट्री’ म्हणजे पूर्वजांचा काळ उलगडणारी केवळ कथा आहे, तर इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांचा खरा पुरुषार्थ आहे. तो फक्त कागदावर मांडून पूर्ण होत नाही,” असे प्रतिपादन ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’ (नवी दिल्ली) राष्ट्रीय संगठन सचिव डॉ. बालमुकुंद पाण्डेय ( Dr. Balmukund Pandey ) यांनी केले.

भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतच्या वतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी पॅराडाईज बँक्वेट हॉल, देवीदास रोड, बोरिवली (प.) येथे ‘स्व. शरद अग्रवाल स्मृति व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. बालमुकुंदजी पाण्डेय यांनी ‘हमारा इतिहास और हम’ (आपला इतिहास आणि आपण) या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.

स्व. शरद अग्रवाल यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, “आपल्याला जो इतिहास शिकवला त्यातून मूळ वास्तव कधी शिकवले गेलेच नाही. ज्या लढाया आपले क्रांतीकारक जिंकले, त्याऐवजी ज्या लढाया हरले त्याचाच धडा आपल्याला शिकवला गेला. महापुरुषांचा फक्त अपमानच केला गेला. खोटा इतिहास समाजापर्यंत पोहोचवला गेला. तो बदलायची खरी गरज होती. स्व. शरद अग्रवाल यांनी पुस्तकाबाहेरचा इतिहास पाहिला आणि खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.”

भारताचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा याकरिता त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “बाबरी ढाचा पाडण्याची क्षमता, राम मंदिरासारखे भव्य मंदिर उभारण्याची क्षमता इतकेच नाही, तर रामसेतूसारखे प्रतीक उभारण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आपला इतिहास हा, वाचल्यावर त्याबाबत गौरव वाटावा, असा असला पाहिजे. त्यासाठी तो ग्रंथ, प्रवचन, अध्ययनाच्या माध्यमातून पोहोचवला पाहिजे. भारताचा मान वाढवणारा इतिहास सर्वांसमोर यावा. यासाठी संघटित व्हायला हवे. तरच आपला भारत येत्या काळात विश्वगुरू म्हणून अभिमानाने पुढे येईल.” यावेळी व्यासपीठावर भारतीय इतिहास संकलन समितीचे कोकण प्रांत अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर, उपाध्यक्ष गौरी माहुलीकर, उपाध्यक्ष रविराज पराडकर, शरद अग्रवाल यांच्या पत्नी रजनी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. शरद अग्रवालजी अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे पश्चिम क्षेत्र सचिव होते. तसेच प्रांत समितीचे एक अग्रणी कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्पित स्वयंसेवक होते. कोकण प्रांतात भारतीय इतिहास संकलन समिती अंतर्गत कार्याच्या प्रचार-प्रसारामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

Powered By Sangraha 9.0