कसा होतो तुळशी विवाह? कधी आहे मुहूर्त?

    11-Nov-2024
Total Views |

 

tulsi vivah

मुंबई : १२ नोंव्हेबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाच्या कालावधीत भगवान विष्णु निद्रिस्त अवस्थेत जातात. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी ते निद्रिस्त अवस्थेतून बाहेर येतात. म्हणून या दिवसाला प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी जसा पंढरपुरात मोठा उत्सव असतो तसाच कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीच्या दिवशीही असतो. प्रबोधिनी एकादशीनंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो आणि राज्यभरात तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते असेही काही लोक मानतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुळशी विवाहाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी तुळशीचे लग्न बाळकृष्णासोबत लावले जाते तर काही ठिकाणी शाळिग्राम अवतारातील भगवान विष्णूंसोबत. या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावन सजवले जाते, तिला आकर्षक रंगांनी रंगवले जाते. काही ठिकाणी त्या वृंदावनाला साडी किंवा ओढणी चढवली जाते. तुळशी शेजारी आकर्षक रांगोळी काढली जाते. तुळशीला नथ, बांगड्या, सोन्याचे दागिने घालून तिला नवरी सारखे सजवले जाते. त्यांनंतर बाळकृष्ण किंवा शाळीग्रामसोबत मध्ये अंतरपाट धरून विधिवत तिचे लग्न लावले जाते. त्यावेळी मंगलाष्टका सुद्धा म्हटल्या जातात. तुळशी शेजारी लग्नात उस ठेवला जातो. लग्नानंतर तुळशीची खण आणि नारळाने ओटीसुद्धा भरली जाते. एकदा का तुळशी विवाह झाला की मग लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू होतात असे आपल्याकडे मानले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नासाठी स्थळ बघायला किंवा लग्नाचा मुहूर्त ठरवायला सुरुवात केली जाते.