प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा उपलब्ध होणार!

10 Nov 2024 15:20:16
Platform Ticket

मुंबई : दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने दि. ९ नोव्हेंबर रोजीपासून फलाट तिकीट ( Platform Ticket ) विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी सामान्य तिकीटधारकांची संख्या तिपटीने वाढल्यामुळे दि. २७ ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. हे पाहता त्याच दिवशी मध्य व पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना, सुरत या स्थानकात दि. ८ नोव्हेंबर रोजीपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता दिवाळी आणि छटपूजा पार पडल्याने दि. ९ नोव्हेंबर रोजीपासून प्रवाशांना पुन्हा फलाट तिकीट देणे सुरू करणार आहे.

Powered By Sangraha 9.0