महाविकास आघाडीची विश्वसनीयता रसातळाला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

10 Nov 2024 14:41:01
 
Amit Shah
 
मुंबई : "काँग्रेसने दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आश्वासनांची विश्वसनियता रसातळाला गेली आहे. तर यूतीच्या आश्वासनांवर संपूर्ण देशातील जनतेला विश्वास आहे," असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले आहे.
 
रविवार, १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे इत्यादी नेते उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "भाजपचा संकल्पपत्र म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार आले त्यावेळी आम्ही आमच्या घोषणा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गरिबांना घर, वीज, गॅस, शौचालय, पिण्याचे पाणी, मोफत धान्य आणि मोफत उपचार देण्याचे काम आम्ही केले. पण दुसरीकडे,काँग्रेसच्या अध्यक्षांना आपल्या नेत्यांना सांगावे लागते की, आश्वासने देताना विचारपूर्वक द्या. कारण ते पूर्ण झाले नाही तर मला उत्तरे द्यावी लागतात. काँग्रेसने दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विश्वसनियता रसातळाला गेली आहे. तर यूतीच्या आश्वासनांवर संपूर्ण देशातील जनतेला विश्वास आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे राहुल गांधींना वीर सावरकरांबद्दल दोन चांगले शब्द बोलण्याची विनंती करणार का? किंवा काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगले वाक्य बोलू शकतात का? हा माझा सवाल आहे. ज्या संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधींनी संसदेत शपथ घेतली, त्याच संविधानाची त्यांच्याकडे कोरी प्रत आढळून आली. भारताच्या संविधानाचा इतका मोठा अपमान आतापर्यंत कधीच झाला नाही. काँग्रेसने केवळ संविधानाचाच नाही तर भारताची संविधान सभा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचेही काम केले."
 
काँग्रेसच्या मनसुब्यांशी जनता सहमत आहे का?
 
"उलेमाच्या एका संस्थेने काँग्रेसला आरक्षण देण्याची मागणी केली आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंनी ही मागणी पूर्ण करण्याचे पत्रकच त्यांना दिले. काँग्रेस पक्षाच्या या मनसुब्यांशी जनता सहमत आहे का? एसटी, एससी, ओबीसी आणि दलितांचे आरक्षण मुस्लिमांना देण्यास जनता तयार आहे का? संविधानानुसार, कोणत्याही धर्माच्या आधारे आरक्षण दिले जात नाही. पण काँग्रेसने सत्तेत येण्याच्या आधीच वचन दिले आहे," असेही अमित शाह म्हणाले.
 
"१० वर्षे युपीए सरकारमध्ये मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी काय केले हे त्यांनी सांगावे. शरद पवार ज्याप्रमाणे आश्वासने देतात त्याचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसतो. खोटे आरोप करून एक नकली जनादेश लिहिण्याचा तुमचा मनसुबा यावेळी शक्य होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता महायूतीच्या बाजूने उभी आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा यूतीचे सरकार येते तेव्हा महाराष्ट्र पुढे जाताना दिसतो आणि जेव्हा आघाडीचे सरकार येते तेव्हा फक्त राजकारणच होते," असेही ते म्हणाले.
"हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे. भाजप आणि महायूतीसाठी संकल्पपत्र म्हणजे केवळ कागद नसून त्या दिशेने पूर्ण ताकदीने काम करण्याची दिशा आहे. आज दुपारी १२ वाजता एक स्थगितीपत्रसुद्धा जाहीर होणार आहे. ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात रस आहे अशा लोकांचे स्थगिती पत्र येणार आहे. पण महाराष्ट्रातील जनतेचा महायूतीवरच विश्वास आहे."
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
संकल्पपत्रातील ठळक मुद्दे!
 
१) लाडक्या बहिणींना दरमहा २१००, म्हणजेच वर्षाला २५,००० मिळणार
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार
३) प्रत्येक गरीबाला अन्न सुरक्षा आणि हक्काचे घर
४) वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला २१०० रुपयांचा आधार
५) राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार
६) १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार विद्यावेतन आणि २५ लाख रोजगार निर्मिती करणार
७) ४५ हजार गावांत पांदण रस्त्यांची बांधणी होणार
८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण
९) वीज बिलात ३०% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर
१०) सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र @2028' सादर करण्यात येईल
११) महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य
१२) मेक इन महाराष्ट्र राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी बनवेल
१३) खतांवरील SGST कर मिळणार परत सोयबिनला प्रति क्विंटल किमान ६ हजार रुपये भाव
१४) २०२७ पर्यंत ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवणार
१५) अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य
१६) महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार
१७) महाराष्ट्रात कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
१८) प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून १० लाख उद्योजक घडवणार
१९) एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
२०. ओबीसी, एसबीसी, इडब्लुएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार
२१) युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी
२२) महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
२३) ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी
२४) सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार फसव्या धर्मातराला आळा बसणार
२५) आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच वन्यप्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार
Powered By Sangraha 9.0