मुंबई : संवत्सर वर्ष २०८१ च्या सुरुवातीला शेअर बाजारात शुक्रवार, ०१ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी ६.०० ते ७.०० च्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग पार पडले. एसएसई एमडी व सीईओ आशिषकुमार चौहान व 'द साबरमती रिपोर्ट' या आगामी चित्रपटातील कलाकारांनी घंटा वाजवून व्यापारी सत्राची सुरुवात केली. लक्ष्मीपूजनानिमित्त तासांच्या या विशेष सत्रात सेन्सेक्स ३३५.०६ अंशांनी मजबूत झाला तर निफ्टी ९९ अंशांनी वधारला. गुरूवारी संवत्सराला तेजीत बंद झालेले दोन्ही निर्देशांक मुहूर्तानिमित्त पुन्हा वधारले. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ७९,८३६.९६ च्या पातळीवर पोहोचला तर एनएसई निर्देशांक निफ्टी ५० २४,३५५.४५ च्या पातळीवर स्थिरावला.
दरम्यान, एनएसईने लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई)ने अधिकृत मोबाइल ॲप (NSEIndia) लाँच केला. तसेच, कॉर्पोरेट वेबसाइट ११ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून गुंतवणूकदारांची सुलभता वाढविण्याकरिता महत्त्वपूर्ण झेप घेतली. मोबाईल अॅप लाँच करताना एसएसई एमडी व सीईओ आशिषकुमार चौहान व 'द साबरमती रिपोर्ट' या आगामी चित्रपटातील कलाकार विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यावेळी उपस्थित होते. एनएसई बेवसाईट आता ११ भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात आधीच इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये जोडून आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओरिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे.
नव्याने लाँच केलेले एनएसई मोबाइल ॲप गुंतवणूकदारांना सहज, सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण प्लॅटफॉर्मसह ऍपल ॲप स्टोअर व अँड्रॉइड ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. दुसरीकडे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स वधारुन ७९ हजार ७२४.१२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ हजार ३०४.३५ अंशांवर बंद झाला. मुहूर्त ट्रेडिंगवेळी निफ्टी ५० मधील प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ३.२६ टक्के, अदानी पोर्ट्स १.३४ टक्के आणि टाटा मोटर्स १.१२ टक्के वधारले. याशिवाय एनटीपीसी, ॲक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल यांच्या समभागातही तेजी आली.
मुहूर्त ट्रेडिंगचे नेमकं महत्त्व काय?
एनएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९९२ मध्ये झाली. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनानंतर एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात एक तासांचे खास व्यापारी सत्र होते. त्यालाच मुहूर्त ट्रेडिंग सत्र असे म्हणतात. व्यापाऱ्यांसाठी बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. त्यांची धारणा आहे की, मुहुर्ताच्या दरम्यान केलेले ट्रेडिंग वाईट शक्तींच्या प्रभावातून मुक्त असते; या काळात बाजारात व्यापार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला उत्तम परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.