( Image Source : ANI )
मुंबई : ( Shaina NC ) शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन.सी. यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
अरविंद सावंत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, "त्यांची अवस्था पाहा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्या, इथे इम्पोर्टेड माल चालत नाही, फक्त ओरिजिनल माल इथे चालतो," असे वक्तव्य केले आहे. याचसंदर्भात त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंत यांच्या वक्तव्यानंतर शायना एन.सी. यांनी महाविकास आघाडीवर टीका करत महाविनाश आघाडी असा उल्लेख केला. याप्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महिला नेत्यासाठी इम्पोर्टेड आणि ओरिजनल माल असे शब्द वापरल्याने शायना एन. सी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते वसंतराव देशमुखांनी बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राजकारण चांगलेच तापले होते. मात्र आता अरविंद सावंतांनासुद्धा हे प्रकरण फार महागात पडणार असल्याचे बोलले जात आहे.