मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याचे चित्र विविध सरकारी विभागाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे (mumbai shivaji nagar air quality). यामधील शिवाजी नगर (चेंबूर), बीकेसी आणि शिवडी परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक (एक्यूआय) 'अत्यंत वाईट' स्तरावर नोंदवण्यात आला आहे (mumbai shivaji nagar air quality). महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी 'जागतिक आरोग्य संघटना' (डब्लूएचओ) आणि 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा'ने (सीपीसीबी) निश्चित केलेल्या मानकांच्या चौपटीने अधिक पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची नोंद करण्यात आली आहे. (mumbai shivaji nagar air quality)
हवेतील 'पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स', विशेषतः पीएम २.५ हे कण खूप सूक्ष्म असतात. हे कण सहजगत्या मानवी फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारक ठरतात. पीएम. २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरक्यांच्या निर्मितीसही कारक ठरते. 'सीपीसीबी'च्या नियमांनुसार हवेतील पीएम २.५ कणांची पातळी ही ६० मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर इतकी असणे आवश्यक आहे. तर 'डब्ल्यूएच'ओ नियमानुसार ती २५ मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर इतकी असावी. मात्र, गेल्या आठवड्याभरात मुंबईतील शिवाजी नगर (चेंबूर), बीकेसी आणि शिवडी परिसरातील हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' स्तरावर नोंदविण्यात आली आहे. यातही आठवडाभर शिवाजी नगरचा परिसर हे खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत प्रथम स्थानावर राहिले आहे.
मुंबईत दररोज 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ', मुंबई महानगरपालिका आणि आयआयटीकडून वायू प्रदूषणाची तपासणी केली जाते. 'वातावरण फाऊंडेशन'ने या तिन्ही संस्थेच्या आकडेवारीचे संकलन केल्यानंतर मुंबईतील वायू प्रदूषणाची गंभीर परिस्थिती समोर आली आहे. ८ आॅक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेने शिवाजी नगरमधील हवेतील पीएम. २.५ कणांची पातळी ११५.१ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढी नोंदवली. ही पातळी भारतीय मानकांच्या (६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत दुपटीने तर 'डब्ल्यूएचओ' मानकांच्या (२५ मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त आहे. बीकेसीमधून १०० मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर आणि शिवडीमधून ८६ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढ्या पीएम. २.५ कणांची नोंद करण्यात आली.
शिवाजी नगरमधील हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीत ट्राॅम्बे, देवनार, चेंबूर या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा समावेश होतो. ट्राॅम्बेमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून बाहेर पडणारे प्रदूषण, देवनार कचराभूमीत लागलेल्या छोट्या छोट्या आगी, कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकची त्याठिकाणी सततची होणारी ये-जा, मेट्रोचे बांधकाम आणि बायोमेडिक कचरा विघटनाच्या कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईत सर्वाधिक वायू प्रदूषित ठिकाण हे शिवाजी नगर झाले आहे. - भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन