लखनऊ : अल्ट न्यूजचा सह संस्थापक मोहम्म्द झुबेर याच्या विरोधात गाझियाबाद पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यती नरसिंहानंद सरस्वती ट्रस्टच्या सरचिटणीस उदिता त्यागी यांनी ही तक्रार दाखल केली असून दोन धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
त्यागी यांनी आपल्या तक्रारित दिलेल्या माहितीनुसार, झुबेर याने नरसिंहानंद यांच्या एका जुन्या कार्यक्रमाची क्लिप फेरफार करुन सोशल मीडीया वर प्रसारित केली, जेणेकरुन, मुस्लिम समाज त्यांच्या विरुद्ध आक्रमक होईल. या प्रकारानंतर, गाझियाबाद मधील दसना देवीच्या मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव नरसिंहानंदांच्या विरोधात घोषणाबाजी करत होता. सदर जमावाने कायदा हातात घेत पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.सद्य परिस्थितीत मंदिराभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार झाल्या प्रकारानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा समाजमाध्यमांवर मिळू लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबेरच्या विरोधात, भारतीय न्याय संहिता कलम १९६ (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २२८ (खोटे पुरावे तयार करणे), २९९ (धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये), ३५६ (३)(बदनामी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस कमिशनर अजय कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुतार सदर घटनेची चौकशी सुरु असून, सोशल मीडीयावर चिथावणीपूर्वक पोस्ट करण्याऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.