धारावीत बद्रीनाथ मंदिराचा देखावा; नवरात्रौत्सवात ठरतोय आकर्षण

07 Oct 2024 15:51:37

dharavi badrinath
 
मुंबई : (Dharavi) जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
 
बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. ज्या भाविकांना एखाद्या तीर्थस्थळी जाणे तितके सोपे नसते, अशावेळी त्यांना त्या ठिकाणी गेल्याचे समाधान मिळावे, या हेतूने हे देखावे सादर करण्यात येतात. यंदा बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारल्यामुळे अनेक भाविकांचा ओघ इथे वाढला आहे.
 
मंडळाच्या वतीने गेली ३८ वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडात्मक उपक्रमांसाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यात येते. रक्तदान, आरोग्य, नेत्रचिकित्सा आदी शिबिरांचेही आयोजन नियमितपणे करण्यात येते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विविध स्पर्धा, व्याख्यानमालादेखील आयोजित केल्या जातात.
 
 
Powered By Sangraha 9.0