मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Shakha Sangam Mulund) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुलुंड भागच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी 'शाखा संगम' हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत बारकू पाटील मैदान, मुलुंड (प.) येथे सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी ऑक्टोबर २०२५ पर्यंत ५३ शाखा, ३० साप्ताहिक मिलन, २ मासिक मिलन (८५ केंद्र) असा संकल्प करण्यात आला. या शाखा संगम निमित्त दि. २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत संकल्प पूर्ती सप्ताह ठरविण्यात आला असून त्यासाठी नगर - शाखा स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या.
हे वाचलंत का? : 'आपल्यातील मतभेद आणि वाद मिटवून संघटित व्हा!'
या सप्ताहात ५१ शाखा, २४ साप्ताहिक मिलन (७५ केंद्र) लागले. यातून संकल्प पूर्ती निम्मित एक मोठे लक्ष्य प्राप्त करण्यात यश आले आहे. आयोजित शाखा संगम कार्यक्रमात एकूण ६५ शाखा/साप्ताहिक मिलन/मासिक मिलन पैकी ६१ केंद्र मैदानात लागली होती. शाखेवर चालणारे योग, सूर्यनमस्कार, खेळ यांचे दर्शन उपस्थित सज्जन शक्तीला झाले. विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरवात बुद्ध वंदनाने झाली. मंचावरती छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा होत्या.
सदर कार्यक्रमास राम मंदिर अक्षता वितरण अभियान निम्मित संपर्कात आलेल्या सज्जन शक्तीने हजेरी लावली होती. त्यासोबतच भानुशाली समाज, गौड सारस्वत ब्राह्मण समाज, बंट समाज, कच्छी लोहणा, कच्छी युवक संघ, जैन समाज, वाल्मीकि समाज इ. ज्ञाती समाजांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारत विकास परिषद, वनवासी कल्याण आश्रम, शिव शंभू विचार मंच, हिंदू जागरण मंच, एकल श्री हरि सत्संग समिति यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. संस्कार भारतीतर्फे ध्वज मण्डल सुशोभीकरण, स्वागत रांगोळी काढण्यात आली होती.
मुलुंड मधील प्रतिष्ठित डॉक्टर डॉ. दहिया हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्बोधनात संघ शाखेवरील चालत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले अखिल भारतीय संपर्क टोळीचे सदस्य रविकुमार अय्यर उपस्थितांना संबोधताना म्हणाले की, संघ हे व्यक्ती निर्माणाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना, तरुणांना शाखेत पाठवावे. शाखेवर संस्कार होतात. देशकार्यात सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन वक्त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाला ८०० स्वयंसेवक, ३०० नागरिकांची उपस्थिती होती. ज्यामध्ये ७० ते ८० महिलांचा सहभाग होता. याठिकाणी पुस्तक विक्रीकेंद्रासह गो उत्पादन, केशवसृष्टी येथील उत्पादने व वनवासी कल्याण आश्रमचे कॅलेंडर विक्रीसाठी उपलब्ध होते.