मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाल्याची बातमी पुढे आली आहे. सचिन कुर्मी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे अज्ञातांनी सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सचिन कुर्मी यांना जे जे रुग्णालयात दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे वाचलंत का? - काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
ही हत्या कोणी केली आणि त्यामागाचं कारण काय होतं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. धारदार शस्त्राने हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, सचिन कुर्मी यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.