चिकाटी, अभ्यास व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वयाच्या केवळ २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या आणि कामातील सकारात्मकता व प्रामाणिकपणा यांच्या साहाय्याने आज अप्पर जिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचलेल्या नवदुर्गा वैदेही रानडे यांच्याविषयी...
वैदेही रानडे या मूळच्या पुण्याच्या. पण, आईवडील नगरला स्थायिक असल्याने त्यांचे शालेय शिक्षण संगमनेरला झाले. शालेय वयात त्यांचा भाषांकडे अधिक ओढा होता. परंतु, त्याकाळी चांगले गुण मिळाले की विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेत असे. सुदैवाने वैदेही यांना लाभलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याने त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. त्यांना दुभाषा म्हणून काम करण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी जर्मन भाषेचे रीतसर शिक्षण घेऊन त्यातून पदवी मिळवली. परंतु, जर्मन भाषेतील पदव्युत्तर पदवीसाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने त्यांची निवड झाली नाही.
लहानपणापासून पाहिलेले दुभाषा होण्याचे स्वप्न अपूर्ण राहूनदेखील त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, तीन मुलींपैकी एकीने तरी आयएएस अधिकारी व्हावे. याच इच्छेचे स्मरण करत त्यांनी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांची तयारी सुरू केली.
प्रथम प्रयत्नावेळी त्या एमपीएससी आणि युपीएससी या दोन्हींच्या प्रथम फेरीतच अनुत्तीर्ण झाल्या. पुन्हा एकदा अपयश येऊनसुद्धा त्यांनी जिद्दीने, नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी त्या फक्त एमपीएससीची परीक्षा देत होत्या. दीड वर्ष कौटुंबिक उत्सव आणि इतर प्रलोभनांपासून दूर राहून केवळ अभ्यासात स्वतःला झोकून देत त्यांनी परीक्षा दिली. त्या उपजिल्हाधिकारी झाल्या, हे त्यांना कळले, तेव्हा प्रथमतः त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
त्यांनी दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी ठाणे जिल्ह्यात पूर्ण केला. त्यानंतर पहिल्या निवडणुकीवेळी वैदेही यांच्या मनात खूप कुतूहल आणि उत्साह होता. तो एक खूप छान आणि संस्मरणीय अनुभव होता. प्रामाणिकपणे काम करणार्याला नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळतो, हे त्यांनी तेव्हा अनुभवले.
वैदेही या महिला आरक्षणाच्या प्रथम तुकडीच्या उपजिल्हाधिकारी असल्यामुळे एक महिला अधिकारी म्हणून लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबाबत खूप उत्सुकता होती. केबिनचा पडदा सारून पाहणे किंवा त्या रॉकेलच्या टँकरची पाहणी करायला टँकरवर चढल्या असता, तिथे लोक जमा होणे अशाही काही गोष्टी घडल्या. परंतु, महिला अधिकार्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल होते, हे जाणून वैदेही यांनी त्याचाही आनंदाने स्वीकार केला.
दि. २६ जुलै २००५ च्या प्रलयावेळी वैदेही यांची मुलगी केवळ सहा महिन्यांची होती. तेव्हा त्यांची घरी जायची वेळ नक्की नसे. त्यामुळे मानसिक ओढाताण होत होती आणि इकडे पुरुषप्रधान संस्कृतीत तरुण महिला अधिकार्याला स्वीकारणे जरा कठीणच! परंतु, आपला रुबाब न दाखवता, त्यांच्यापैकीच एक होऊन, त्यांची मानसिकता समजून घेऊन वैदेही यांनी काम केले आणि त्यात त्या यशस्वी झाल्या.
त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही एक महिला म्हणून त्रास झाला नाही. त्यांनी स्वतःदेखील महिला म्हणून कधी अधिकची सूट मागितली नाही. गरोदरपणातदेखील त्या सातव्या-आठव्या महिन्यापर्यंत कार्यरत होत्या. अर्थातच, यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य खूप मोलाचे आहे. “अधिकारी हा केवळ फाईलवर सही करण्यासाठी नसतो, तर त्याला त्या फाईलची लेस बांधण्यापासून सर्व काही नव्याने शिकावे लागते आणि त्यासाठी शिपायापासून सर्वांचीच मदत होते,” असे सांगत त्या कृतज्ञता व्यक्त करतात.
सिंधुदुर्गमध्ये असताना तेथील मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्यासाठी तपासणी व मार्गदर्शन शिबिरे त्या भरवत असत. तसेच, पौगंडावस्थेतील मुलगे अधिकतर दुर्लक्षित राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी मार्गदर्शन व संवादसत्रे त्या आयोजित करीत. हे उपक्रम सिंधुदुर्गमधील बहुतेक गावी पोहोचले होते. नंतर बदली झाल्यामुळे तेथील उपक्रमांत त्या योगदान देऊ शकल्या नाहीत. परंतु, भविष्यात त्यांना महिला व मुलांसाठी काम करायला नक्की आवडेल, असेही त्या आवर्जून सांगतात.
“चांगल्या अधिकार्यांची आपल्या देशाला, राज्याला गरज आहे. महिला म्हणून या क्षेत्रात फार आव्हाने नाहीत; त्यामुळे मुलांबरोबरच मुलींनीही या क्षेत्राकडे वळावे,” असे आवाहन वैदेही आजच्या तरुण पिढीला करतात.
२०१७ साली त्यांना बढती मिळून, त्या उपजिल्हाधिकारी पदावरून अप्पर जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या. आज त्या ठाण्यातील ‘जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती’च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. कोविड कालावधीमध्येदेखील त्यांना सेवा देता आली, याबद्दल त्या समाधान व्यक्त करतात.
वैदेही यांच्या हातून यापुढेही असेच सत्कार्य होत राहो, अशी दुर्गादेवीचरणी प्रार्थना!
लेखिका - ओवी लेले