“हिंदीत काम करुन आलेल्या मराठी कलाकारांना अधिक ग्लॅमर मिळतं पण...”; मधुराने व्यक्त केली खंत

    04-Oct-2024
Total Views |

madhura   
 
मुंबई : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहिर केला आहे. सर्व स्तरांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले जात आहेत. मराठी कलाविश्वातूनही या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि गर्भश्रीमंती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न ‘मधुरव : बोरु ते ब्लॉग’ या कार्यक्रमातून अभिनेत्री मधुरा वेलणकर करत आहे. दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना मधुरा म्हणाली की,“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. मराठी भाषेत श्रीमंती आहेच. मराठी भाषा जनमाणसांत रुजावी आणि तिची श्रीमंती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा निर्णय हुकमी एक्का नक्कीच ठरला आहे आणि त्यासाठी मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते”. पण यावेळी तिने मराठी कलाकारांबद्दल एक खंत देखील व्यक्त केली आहे.
 
मधुरा म्हणाली की, “मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकार जेव्हा हिंदी किंवा अन्य भाषेतून काम करुन येतात तेव्हा त्यांना मराठी मनोरंजनसृष्टीत अधिक ग्लॅमर मिळतं शिवाय मानधनातही फरक पडतो. पण माझी एक खंत आहे की, जे कलाकार गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत त्यांना तो मान सन्मान का मिळतच नाही. अर्थात कलाकाराने कोणत्याच भाषा, धर्म, जात यात अडकायला नकोच कारण कला ही वैश्विक आहे. परंतु, प्रत्येत कलाकाराने विचार केला पाहिजे की, आपलं पुढचं पाऊल इतर भाषेतील हवं की मराठीच्या खोलात जाऊन मराठी भाषेला पुढे नेण्याचं हवं हे ठरवलं पाहिजे”. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा हुकमी एक्का तर आहेच पण ती टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न देखील करणं तितकंच गरजेचं आहे असं देखील मधुरा म्हणाली.