मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरताहेत : एकनाथ शिंदे

04 Oct 2024 12:31:01
 
tembhi naka devi
 
ठाणे, दि. ३ : ( Tembhi Naka Devi ) “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण ‘मातोश्री’वर येत असत. आता मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरत आहेत,” असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठांचे नाव न घेता सोडले आहेत.
 
‘जय अंबे माँ सार्वजनिक विश्वस्त संस्थे’तर्फे टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी विशेष संस्मरणीय ठरला. देवीच्या मिरवणुकीत यंदा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार्टर्ड विमानाने देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी, मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रारंभ केलेल्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते. कळवा ते ठाणे (टेंभी नाका) दरम्यान चालणार्‍या देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण, पारंपरिक वेषभूषेतील लोकनृत्य, तुतारी, संबळ वादकांची पथके यांच्या सहभागासोबतच रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी झाली होती.
 
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नरेश म्हस्के, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह उबाठा गटाचे माजी खा. राजन विचारे व हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. दुपारी सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने वाहतुककोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठांवर टीकेचे बाण सोडले. “मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा,’ यासाठी केविलवाणा प्रकार सुरू आहे. एकेकाळी सर्वजण ‘मातोश्री’वर यायचे. आता बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरताहेत,” असे स्पष्ट करून “२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी धोका दिला त्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवेल,” असे भाकितही मुख्यमंत्र्यांनी वर्तविले.
 
पुन्हा महायुतीचे सरकार येईल
 
गेल्या दोन वर्षांत देवीच्या आशीर्वादाने आम्ही अनेक प्रकल्प पूर्ण केले. अनेक उद्योग आणले. सर्व लाडक्यांसाठी इकोसिस्टीम तयार करून अनेक कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे लोकच या सरकारला ‘लाडकं सरकार’ म्हणतात. तेव्हा तुम्हीच या कामाचे मूल्यमापन करा. अडीच वर्षांतील महाविकास आघाडीचे काम आणि आमचे काम पहा, देवीच्या आशीर्वादाने या कामाची पावती जनता देईल आणि महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0