कल्याण: बदलापूर येथील शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा एन्काऊंटर झाला. शाळेचे अध्यक्ष कोतवाल, सचिव आपटे हे पसार होते. त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल होते. त्यांनी उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनाकरीता अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. दोन दिवसापूर्वी कोतवाल आणि आपटे या दोघांना कर्जतहून अटक करण्यात आले. त्यांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी एका गुन्हयात त्यांना जामीन मंजूर केला होता. दुसऱ्या गुन्ह्यात दोघांचा ताबा पोलिसांकडे दिला होता. पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा कोतवाल आणि आपटे या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले या न्यायालयासमोर शरण आल्या. त्यांनीही जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने आठवले यांनाही जामीन मंजूर केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले.
असता सरकारी वकील अश्वीनी भामरे पाटील यांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर न्यायाधीश मुळे यांनी गुरुवारीच या प्रकरणी सरकारी पक्षाने म्हणणे मांडावे असे सांगितले होते. आरोपी पोलिसांच्या ताब्यात दोन दिवस होते. म्हणणे मांडण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे. तसेच गुन्ह्यातील कलम हे जामीनपात्र असल्याने त्यांना पोलिस कोठडी देता येत नाही. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असणे आणि त्याचे कलम जामीनपात्र असणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे पोलिस कोठडी देता येत नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.