रेल्वे प्रवासात 'या' वस्तू नेण्यासाठी येणार बंदी! जाणून घ्या काय आहे यादी?
31-Oct-2024
Total Views |
मुंबई : ( Western Railway ) नुकतंच मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर आता पश्चिम रेल्वेने नवे निर्देशपत्रक जारी केले आहे. या पत्रामध्ये प्रामुख्याने प्रवाश्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये असेह म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल.
पश्चिम रेल्वेकडून स्थानक परिसर आणि रेल्वेफलाटावर ड्रम आणि इतर तत्सम वस्तू तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील सर्व तिकीट तपासकांना एका पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. सणासुदीच्या काळातील प्रवाशांच्या लक्षणीय गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवासाच्या डब्यात विशिष्ट प्रमाणातच सामान मोफत घेऊन जाण्याचा अधिकार आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार विविध श्रेणीतील प्रवाश्यांसाठी ४० किलो ते ७० किलो पर्यंतच्या मोफत सामानाची परवानगी आहे. तर एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये ७० किलोपर्यंत सामानाची परवानगी आहे. तर एसी 2-टियर ५० किलोपर्यंतची मर्यादा आहे. एसी 3-टियर, एसी चेअर कार आणि नॉन एसी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४० किलो मोफत सामान नेण्याची परवानगी आहे आणि द्वितीय श्रेणीतील प्रवासी ३५ किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकतात. प्रवाशांचे सामान निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास रेल्वे त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते. वजनाबरोबरच सामानाचा आकारही ठरलेला असतो. १०० सें.मी. X ६० सेमी. X २५ सेमी. या आकाराचे ट्रंक, सूटकेस आणि बॉक्सेस (लांबी X रुंदी X उंची) वैयक्तिक सामान म्हणून प्रवासी डब्यात नेण्याची परवानगी आहे.
या निर्देशात असे अधोरेखित करण्यात आले आहे की, मोठ्या आणि अवजड सामानामुळे प्रवाशांच्या सुरळीत प्रवासात अडथळा निर्माण होतो व गर्दीचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे होते. पत्रानुसार, स्थानक आणि पथक प्रभारींना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यावर वैयक्तिकरित्या देखरेख करण्याचे काम देण्यात आले आहे. या निर्देशाचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये मोठा ड्रम घेऊन चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या व्हायरल व्हिडीओनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान सुमारे २.५ कोटी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. वाहतुकीसाठी भारतीयांची पहिली पसंती रेल्वे आहे. कारण देशातील सर्व प्रमुख शहरे रेल्वेच्या जाळ्यामुळे एकमेकांना जोडलेली असल्यामुळे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे भाडे या गोष्टींमुळे लोक प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात.