अर्बन नक्षलींचा बिमोड करावाच लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
31-Oct-2024
Total Views |
गांधीनगर : "भारताच्या विकासामुळे आता काही जणांना अडचण निर्माण झाली आहे. केवळ राजकारणासाठी आणि स्व:ताचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काही लोक देशाच्या एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत"असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आपल्याला आता लढायचे आहे असा संदेश मोदींनी दिला. राष्ट्रीय एकत्मता दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी गुजरात मधल्या केवाडीया येथे बोलत होते.
सरदार पटेल यांच्या स्मृतीस्थळाला मानवंदना देत मोदी म्हणाले " आज जगभरातील देश भारताजवळ येत आहेत. ही काही सामान्य बाब नव्हे. नवीन इतिहास रचला जात आहे. भारत आपल्या समस्यांचे निवारण कसे करतो याकडे जगाचे लक्ष्य आहे. म्हणून आपल्याला आपल्या देशाच्या एकतेचे जतन केले पाहिजे.
अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात लढाईची गरज
भारताबद्दल अपप्रचार करणाऱ्या लोकांबद्दल मोदी म्हणाले "भारताच्या विकासामुळे काही जणांच्या पोटात दुखू लागले. काही जणांना भारतात अशांतता आणि अराजकता माजवायची आहे, जेणेकरून जागतिक पातळीवर चुकीचा संदेश जावा अशी त्यांची इच्छा आहे. ही माणसे खोटा प्रचार प्रसार करीत आहेत. जातीच्या नावावरून लोकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. यांना भारताची एकत्मता आणि अखंडता तोडायची आहे. त्यांना, भारताने केलेली प्रगती बघवत नाही. कारण गरीब भारत, कमजोर भारत यावर ते त्यांच्या राजकारणाची पोळी भाजली जात आहे. संविधानाच्या नावाखासली आज ही माणसे देश तोडायला निघाली आहेत.त्यांची आघाडी ओळखून आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे."
एक देश एक संविधानाची पूर्ती!
आधारच्या यशावर भाष्य करताना म्हणाले " आज भारतातल्या आधार संकल्पनेची च जगभरात दखल घेतली जात आहे. त्याच सोबत एक राष्ट्र एक कर अश्या जीएसटी आणि आरोग्यासाठी सुरू असलेल्या आयुष्यमान भारतची सुद्धा चर्चा होत आहे. याच बरोबर आता आपला देश आता एक देश एक सिव्हील कोडच्या दिशेने वाटचाल करीत आहे याचा मला आनंद आहे. असे सुद्धा मोदी म्हणाले. त्याच बरोबर मोदी म्हणाले " मागच्या ७० वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पूर्णपणे अंमलात आणले गेले नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे कलम ३७० आणि जम्मु आणि काश्मीर. संविधानाचा जप करणाऱ्या लोकांना अगणित वेळा अपमान केला आहे. या वर्षी जम्मु आणि काश्मीर मध्ये निवडूण आलेल्या लोकांनी पहिल्यांदाच भारताच्या संविधानावर हात ठेवून शपथ ग्रहण केली आहे. देशात अखेर एक देश एक संविधानाची पूर्ती झाली ज्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानकर्त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल.
पंतप्रधान म्हणाले की, या वर्षीचा राष्ट्रीय एकता दिवस सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीची सुरुवात आहे आणि आपला देश दोन वर्षे हा उत्सव साजरा करणार आहे.