बंड शमले; आ. केळकर यांचा मार्ग मोकळा सेनेच्या इच्छुकांनी महायुतीचा धर्म पाळला.
31-Oct-2024
Total Views |
Relegion of Mahayuti : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे या दोघांनीही उमेदवारी अर्जच दाखल केले नसल्यामुळे महायुतीमधील बंड शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनीही आपल्या तलवारी म्यान केल्याने ठाणे मतदार संघात संजय केळकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आ. संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आहे. संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांच्या बंडाच्या तलवारी म्यान.
या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून शहरभर बॅनरबाजी केली होती. मात्र, आ. केळकर यांना पुन्हा तिकीट दिल्यामुळे भोईर नाराज झाले होते. त्याचबरोबर शिंदे सेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करीत बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. हे दोघे अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते.
यामुळे ठाणे शहर मतदारसंघात बंड अटळ मानले जात होते. या बंडामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे निर्देश देताच भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या बंडाच्या तलवारी म्यान केल्या आहेत. गेले काही दिवस महायुतीतील बेबनाव संपुष्टात आला असून संजय केळकर यांच्या हॅट्ट्रीकचा मार्ग मोकळा झाला आहे.