दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून कठोर उपाययोजना; प्रवाशांना सुरक्षेबाबत आवाहन
31-Oct-2024
Total Views |
मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवासानिमित्त होत असलेल्या गर्दीच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे परिसरात काही धोकादायक आणि ज्वलनशील वस्तू आढळल्यास, त्याबाबत कळवण्याचे आरपीएफचे आवाहन केले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षाविषयक सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याबाबत प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मदत क्रमांकावर रेल्वे सुरक्षा दलाला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने देशभरात प्रकाश, आनंदाचे वातावरण आणि प्रवासाच्या प्रमाणाही वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि निर्विघ्न रेल्वे प्रवास करता यावा याकरिता सुरक्षाविषयक कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत.
दिवाळी आणि छठ हे दोन्ही सण आनंद आणि एकतेची भावना वृद्धिंगत करणारे सण असून यावेळी प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी केले. आम्ही प्रवाशांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले.