पत्नी धर्माचा अवमान करते हे कारण वैध ठरवत पतीला दिला घटस्फोटाचा अधिकार!
31-Oct-2024
Total Views |
मुंबई : ( Chhattisgarh High Court ) छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय जयस्वाल यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या खटल्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर पत्नीने पतीच्या धार्मिक श्रद्धांची खिल्ली उडवली तर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार पतीला आहे. तसेच निकाल देताना पती-पत्नीच्या नातेसंबंधावर धार्मिक ग्रंथ, रामायण आणि महाभारतात नमूद केलेल्या समजुतींचा हवाला दिला आहे. या आधारे न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला असून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्या पत्नीने स्वत: कबूल केले की तिने गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही हिंदू धार्मिक पूजा विधीमध्ये भाग घेतलेला नाही. पूजा करण्याऐवजी तिने चर्चमध्ये जाणे पसंत केले. न्यायालयाने पुढे म्हटले की, इथे धार्मिक प्रथांबाबत परस्पर समंजसपणा दाखवणे अपेक्षित आहे, हे आंतरधर्मीय लग्नाचे प्रकरण नाही.
न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात पतीने सांगितले की पत्नी वारंवार त्याच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे. त्याच्या देवी-देवतांचा अपमान केला. खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, न्यायालयाच्या मते, जिच्याकडून 'सहधर्मिनी' असणे अपेक्षित आहे, तिच्याकडून अशी वागणूक हे एका धर्माभिमानी पतीवर झालेला मानसिक आघात आहे. यावेळी न्यायालयाने धार्मिक ग्रंथांचाही हवाला दिला.
खंडपीठाने सांगितले की, केवळ महाभारत आणि रामायणातच नाही तर मनुस्मृतीतही पत्नीशिवाय कोणताही यज्ञ अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हिंदू धार्मिक कार्यात पत्नी ही पतीच्या बरोबरीची भागीदार असते. न्यायालयाने पुढे सांगितले की, पती हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याला कुटुंबातील सदस्यांसाठी धार्मिक विधी करावे लागतात. यानंतर उच्च न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळली.
मध्यप्रदेशमधील दिंडोरी जिल्ह्यातील करंजिया येथे राहणारी नेहा ख्रिश्चन धर्माचे आचरण करत होती. तिने ७ फेब्रुवारी २०१६ रोजी बिलासपूर येथील विकास चंद्रासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. विकास नोकरीमुळे दिल्लीत वास्तव्यास होता. नेहासुद्धा लग्नानंतर काही दिवस विकाससोबत दिल्लीत राहिली. मात्र त्यानंतर ती बिलासपूरला परतली. यादरम्यान नेहाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर तिचे चर्चमध्ये येणे-जाणे सुरू झाले.
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर नेहाने हिंदू धार्मिक प्रथा-परंपरा आणि देवी-देवतांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. विकासने नेहाला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत तिने त्याचे बोलणे न ऐकल्याने वैतागून विकासने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीनंतर कौटुंबिक न्यायालयाने विकासच्या बाजूने निकाल दिला.