मुंबई : अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून एकदा तसा प्रयत्न करण्यात देखील आला होता. दरम्यान, नुकतीच त्याला ज्या इसमाने धमकी दिली होती त्याने २ कोटींची मागणी केली होती. तो आरोपी आझम मोहम्मद मुस्तफा वांद्र्याचा रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर अज्ञात व्यक्तीने सलमानला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी वेगवेगळे संदेश पाठवून त्याने केली होती.
या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश सुतार, सचिन पालवे आणि अंमलदार मुजावर, चव्हाण आणि बोडके यांनी आरोपीचा सीडीआर लोकेशनद्वारे शोध सुरू केला. आणि अखेर तो वांद्रे परिसरात असल्याचे समजताच तेथून मुस्तफाला अटक करणयात आली. त्याला ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.