राज्यात यंदा भाजपचाच मुख्यमंत्री! २०२९ मध्ये मनसेला सत्ता मिळणार, राज ठाकरेंचा दावा

    30-Oct-2024
Total Views |
mns chief raj thackeray on election


मुंबई :   
  २०२४ मध्ये राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे भाकित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी केले. तसेच २०२९ मध्ये मनसेला सत्ता मिळण्याचा दावाही त्यांनी केला. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. अमित ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवार मैदानात उतरवला आहे.


त्याविषयी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, अमित विरोधात माहिममध्ये उमेदवार देणे, हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या घटनांवर राज यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. एखाद्या पक्षातील नेते फोडून मला पक्ष निर्माण करायचा नव्हता. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडताना शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. पण महाराष्ट्र आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली.